राहुल यांचे मोदींना थेट सवाल
By admin | Published: December 29, 2016 12:46 AM2016-12-29T00:46:47+5:302016-12-29T00:46:47+5:30
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला कोंडीत पकडण्याची पूर्ण योजना आखल्याचे
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला कोंडीत पकडण्याची पूर्ण योजना आखल्याचे दिसत असून, त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना नोटाबंदीसंदर्भात पाच सवाल केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी देतील वा नाही, हे माहीत नाही. मात्र या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना अवघड आहे, हे मात्र नक्की.
पश्चिम बंगालमध्ये नोटाबंदीच्या आधी भाजपने कोट्यवधी रुपये बँकांत जमा केले होते. या पार्श्वभूमीवर राहुल यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
या प्रश्नांची उत्तरे देणेही मोदी यांच्यासाठी सोपे नाही. मोदी कायमच राहुल यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण जनतेलाही या प्रश्नांच्या उत्तरात खूपच रस आहे.
या प्रश्नांच्या निमित्ताने राहुल यांनी, नोटाबंदीमुळे रांगेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने भरपाई दिली का? नसेल तर का नाही? असाही सवाल केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयासाठी कोणकोणत्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली होती त्यांची नावे जाहीर करावीत, असेही राहुल यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी अशी मागणी केली की बँकेतून २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा मागे घेण्यात यावी. त्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किमतीवर २० टक्के बोनस द्यावा, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना २५ हजार रुपये द्यावेत, मनरेगाचे कामाचे दिवस आणि मजुरी दुप्पट करण्यात यावी. स्वीस बँकेत भारतीयांच्या खात्यांचा खुलासा संसदेत मोदी कधी करणार आहेत? असा सवाल करून ते म्हणाले की, मोदी नावे जाहीर करीत नाहीत कारण त्या लोकांना ते संरक्षण देऊ इच्छितात.
राहुल यांनी पंतप्रधानांना विचारलेले प्रश्न
- आठ नोव्हेंबरनंतर किती काळा पैसा बाहेर आला?
- ८ नोव्हेंबरच्या रात्री जेवढ्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या, तेवढ्याच बँकांमध्ये पुन्हा जमा झाल्या आहेत, अशी रिझर्व्ह बँकेचीच आकडेवारी आहे. हे खरे आहे का?
- नोटाबंदीमुळे देशाचे किती नुकसान झाले, किती लोकांना रोजगार गमवावा लागला?
- देशात नोटाबंदीमुळे किती लोकांचा जीव गेला?ं
- ८ नोव्हेंबरच्या आधी तीन महिने अर्थात ८ आॅगस्ट ते ८ नोव्हेंबर दरम्यान कोणी कोणी बँकांमध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली त्यांची नावे काय आहेत?