आठ राज्यांत ७२ ठिकाणी धाडी; दहशतवादी संबंध उघड करण्यासाठी NIA ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 08:54 AM2023-02-22T08:54:39+5:302023-02-22T08:54:54+5:30
सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते.
नवी दिल्ली : कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी गट आणि अमलीपदार्थ तस्कर यांच्यातील संबंधांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आठ राज्यांमध्ये ७२ ठिकाणी धाडी टाकल्या. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात छापेमारी सुरू आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते. एका प्रकरणात त्याचे नावही आहे. भारतात आणि विदेशात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांकडून पैसे जमा करणे, दिल्ली आणि देशाच्या अन्य भागांतून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणे आणि प्रतिष्ठित लोकांची हत्या करणे आदी प्रकरणांचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतलेला आहे. यापूर्वीही एनआयएने एकाचवेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.
एफसीआय भ्रष्टाचार : सीबीआयच्याही धाडी
व्यापारी आणि तांदूळ मिलमालक यांच्या फायद्यासाठी निकृष्ट धान्य खरेदी करणाऱ्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्यांविरुद्ध मंगळवारी सीबीआयने मोठी कारवाई केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून सीबीआयने पंजाबमधील ३० ठिकाणी धाडी टाकल्या.
सीबीआयच्या पथकांनी ‘ऑपरेशन कनक २’चा भाग म्हणून धान्य व्यापारी, तांदूळ मिलमालक आणि एफसीआयचे सेवानिवृत्त आणि सेवेतील अधिकारी यांच्या जागेवर छापे टाकण्यास सुरुवात केली. ही कारवाई राजपुरा, सरहिंद, पटियाला, फतेहगढ साहिब, मोहाली, मोगा, फिरोजपूर, लुधियाना, संगरूर आदी भागात करण्यात आली. एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दुसऱ्यांदा धाडी टाकल्या आहेत. खासगी मिलमालकांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्यावर पडदा टाकत अधिकाऱ्यांच्या या समूहाने गुदामात उतरविण्यात आलेल्या प्रतिट्रकवर १००० ते ४००० रुपये लाच घेतली असा ठपका आहे. त्यानंतर ही रक्कम कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत वितरित केली.