चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:20 AM2024-05-20T07:20:47+5:302024-05-20T07:21:35+5:30
अधिकाऱ्यांनी दिवसभरात ४० कोटींची रोकड जप्त केली. परंतु नोटांची मोजदाद सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
आग्रा : काही व्यावसायिकांकडून करचोरी केली जात असल्याच्या संशयावरून आयकर विभागाने रविवारी सकाळी आग्रा येथील चप्पल व्यापाऱ्याकडे छापे टाकले. या वेळी व्यापाऱ्याकडे नोटांचा ढीग पाहून आयकरचे अधिकारीही चक्रावले. अधिकाऱ्यांनी दिवसभरात ४० कोटींची रोकड जप्त केली. परंतु अजूनही नोटांची मोजदाद सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी आग्र्यातील तीन चप्पल व्यावसायिकांकडे छापेमारी केली. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती आढळून आली. ५०० च्या नोटांचा ढीग पाहून अधिकाऱ्यांना त्यांची मोजणी करण्याचेही आव्हान होते. या नोटा मोजण्यासाठी त्यांनी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण केले.
मशीनच्या मदतीने रोकड मोजताना बँकेचे कर्मचारीही थकून गेले. दिवसअखेर ४० कोटींची रोकड मोजून झाली होती. उर्वरित रोकड मोजण्याचे काम सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. छापेमारी केलेले व्यापारी नेमके कोण आहेत, त्याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.