अॅक्सिस, कोटकवर छापे
By admin | Published: December 24, 2016 01:26 AM2016-12-24T01:26:50+5:302016-12-24T01:28:29+5:30
अॅक्सिस बँकेच्या येथील शाखेवर ८९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांबद्दल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला
अहमदाबाद : अॅक्सिस बँकेच्या येथील शाखेवर ८९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांबद्दल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून, त्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. ईडीने अहमदाबादच्या मायामनगर शाखेवर छापा टाकून १९ खात्यांची छाननी केली. या खात्यांनी केवायसीची (नो युवर कस्टमर) पूर्तता केलेली नसल्याचे आढळले आणि त्यात ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर ८९ कोटी रुपये भरण्यात आले. त्यानंतर ही रक्कम लाभार्थींच्या खात्यात पाठवण्यात आली. या प्रकरणी बँकेच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी होत आहे.
नोटाबंदीनंतर अॅक्सिस बँकेच्या दिल्ली, नॉयडा येथील शाखांवरही छापे घालण्यात आले आहेत. आतापर्यंत त्या बँकेचे जवळपास ३0 कर्मचारी निलंबित असून, काहींना अटकही करण्यात आली आहे. ठरावीक मंडळींना जुन्या नोटांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात नव्या नोटा देणे, मनी लाँड्रिंग, हवाला आणि बोगस लॉकर्समध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या व नव्या नोटा यामुळे अॅक्सिस बँक वादात सापडली आहे. मात्र तपास यंत्रणांना बँक पूर्ण सहकार्य करीत असल्याचा दावा बँकेच्या व्यवस्थापनाने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोटक महिंद्रवरही छापा
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोटक महिंद्र बँकेच्या येथील दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील शाखेवर तिच्या दोन खात्यांसंदर्भात छापा घातला. अॅक्सिस बँकेतील घोटाळ्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोटक महिंद्र बँकेवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र आमच्याकडे कोणतीही बनावट खाती नाहीत, असा दावा बँकेने केला आहे. कोटक महिंद्र बँकेचे प्रवक्ते रोहित राव म्हणाले की, केवायसीच्या पूर्ततेमध्ये कोणतीही उणीव राहिलेली नाही. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने बँकेच्या व्यवस्थापकांनाही प्रश्न विचारले आहेत. बँकेच्या विरोधात कोणताही अहवाल दिला गेलेला नाही व बँकेत कोणतीही बनावट खाती नाहीत, असे राव म्हणाले. तरीही बँक चौकशीला पूर्ण सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले.
दोघांना अटक : मात्र कोटक महिंद्र बँकेतील काही व्यवहार संशयास्पद असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. तेथील बोगस खात्यांबाबत दिल्ली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या खात्यात ३४ कोटी रुपये असल्याचे शुक्रवारी उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दोघांनी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले असून, त्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील कॉर्पोरेशन बँकेतील खात्यांचा उपयोग केला, असे सांगण्यात येत आहे.