गोव्यात मटका अड्ड्यांवर छापे
By Admin | Published: October 22, 2015 01:24 AM2015-10-22T01:24:24+5:302015-10-22T01:24:24+5:30
गोव्यात राजरोसपणे चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात हायकोर्टाच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविल्यानंतर बुधवारी गुन्हा अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम उघडली. पणजीत
पणजी : गोव्यात राजरोसपणे चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात हायकोर्टाच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविल्यानंतर बुधवारी गुन्हा अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम उघडली. पणजीत दहा मटका अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांत तीन जणांना अटक करण्यात आली.
मटक्याचे आकडे छापल्याबद्दल तरुण भारत व पुढारी या वृत्तपत्रांसह ११ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर मटक्याविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. पणजीतील छाप्यांत पाच हजार रुपये जप्त करण्यात आले, अशी माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली. निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. छापासत्र चालूच
राहणार असून राज्याच्या इतर भागांतही छापे टाकण्यात येणार आहेत.
माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये (रा. रायबंदर-गोवा) यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एप्रिल २०१५ मध्ये मटक्यांच्या अड्ड्यांविरोधात एक जनहित याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)
‘पुढारी’ला सुधारित नोटीस
मटक्याचे आकडे प्रसिद्ध केल्याप्रकरणी पुढारीच्या गोवा आवृत्तीला क्राईम ब्रँचकडून बुधवारी निवासी संपादकांच्या नावे सुधारित नोटीस बजावण्यात आली. किती काळापर्यंत मटक्याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले, त्यातून किती व कशाप्रकारे फायदा मिळत होता. कोणाकडून प्रसिद्धीसाठी आकडे मिळत होते, यासह इतर सविस्तर माहिती नोटिशीद्वारे मागविण्यात आली आहे.
पत्रकारांचेही हात काळे!
काशिनाथ शेट्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘मटक्याचा हप्ता केवळ पोलिसांनाच नव्हे, तर काही पत्रकारांनाही जातो. त्यामुळे प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी मी क्राईम ब्रँचकडे केली आहे.’