कृषी, वस्त्रोद्योग कंपन्यांवर छापे, 27 ठिकाणी IT ची छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:46 AM2022-07-27T05:46:30+5:302022-07-27T05:47:13+5:30
27 ठिकाणी प्राप्तिकर विभागाची छापेमारी, 1.40 कोटींची रोकड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील एका मोठ्या उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापेमारी करत सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी मुंबई आणि दिल्ली येथे २७ ठिकाणी छापेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत या समूहाने शेअर बाजारात कार्यरत आपल्या विविध कंपन्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये वाढ करण्यासाठी या कंपन्यांचा नफा वाढवून दाखविला. यासाठी खरेदी-विक्रीचे अनेक बनावट आणि कागदोपत्री व्यवहार करत त्यातील नफेखोरी वाढवून दाखवली. याचा परिणाम कंपनीच्या समभागांच्या किमती वाढण्याच्या दृष्टीने झाला.
संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे सापडली
याशिवाय, समूहातील दोन कंपन्यांत कागदोपत्री व्यवहार दाखवत तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार हे रोखीने केल्याचेही दिसून आले. याचप्रकारे समूहातील दुसऱ्या दोन कंपन्यांत १५० कोटी रुपयांचे व्यवहारही रोखीने झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासादरम्यान दिसून आले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहारांची अनेक कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असून, याचसोबत संगणकदेखील जप्त केला आहे.