कर्नाटकातील ‘त्या’ रिसॉर्टवर छापे, गुजरातचे आमदार ठेवलेले हॉटेल मंत्र्याच्या मालकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:30 AM2017-08-03T04:30:05+5:302017-08-03T04:30:17+5:30
भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या ४४ आमदारांना बंगळुरूच्या ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे ...
बंगळुरू : भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या ४४ आमदारांना बंगळुरूच्या ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे तसेच त्याचे मालक असलेले कर्नाटकचे ऊ र्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे घातले. या छाप्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, आमच्या आमदारांवर दबाव आणण्यासाठीच छापे घालण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
काँग्रेसचे गुजरातमधील राज्यसभेचे उमेदवार अहमद पटेल यांनी आमदारांवर दबाव आणण्यासाठी व सुडबुद्धीने हे करण्यात आल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेत गुलाब नबी आझाद व आनंद शर्मा तसेच लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनीही असाच आरोप केंद्र सरकारवर केला.
मात्र ईगलटन गोल्फ रिसॉर्टमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या दालनातच छापा घालण्यात आला. तिथे ते काही कागदपत्रे फाडताना दिसून आले. त्यांच्या निवासस्थानीही छापा घालण्यात आला.
मुख्यमंत्री संतापले-
आमदार तिथे राहत असल्यामुळे त्यासाठीच्या भाड्याची रक्कम बँकेद्वारे रिसॉर्टच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असे काँग्रेसने सांगितले. छाप्यांची माहिती स्थानिक पोलिसांना द्यायची असते. पण या छाप्यांपूर्वी अशी सूचना देण्यात आली नाही. तसेच सीआरपीएफला तिथे नेल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संताप व्यक्त केला.