मनी लाँड्रिंगप्रकरणी तीन राज्यांत छापे
By Admin | Published: November 21, 2015 02:31 AM2015-11-21T02:31:43+5:302015-11-21T02:31:43+5:30
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याविरुद्धच्या मनी लॉड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसंदर्भात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी तीन
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याविरुद्धच्या मनी लॉड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसंदर्भात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी तीन राज्यांमधील किमान १२ ठिकाणी छापे घातले.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, वीरभद्र सिंग यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि दिल्लीत नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्यांच्या दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. शुक्रवारी सकाळी छाप्याची सुरुवात झाली. वीरभद्र सिंग यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून निधी घेणाऱ्या काही व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या कार्यालयांवरही छापे टाकले आहेत.
सीबीआयने गेल्या सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीची दखल घेतल्यानंतर ईडीने वीरभद्र सिंग यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलमान्वये मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)
वीरभद्र सिंग हे केंद्रीय पोलादमंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी २००९ आणि २०११ या काळात ६.१ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे. वीरभद्र सिंग यांनी या काळात एलआयसी एजंट चौहान याच्या माध्यमातून आपल्या आणि कुटुंबियांच्या नावावर आयुर्विमा पॉलिसीत ६.१ कोटी रुपये गुंतविल्याचा सीबीआयचा संशय आहे. हा पैसा कृषी उत्पन्नातून मिळाल्याचे वीरभद्र सिंग यांचे म्हणणे आहे.