दुधाच्या वाहतुकीसाठी ‘रेल मिल्क टॅँक व्हॅन’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 10:35 PM2020-05-27T22:35:42+5:302020-05-27T22:36:29+5:30
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात भारतीय रेल्वे आठवड्याचे सातही दिवस अखंडित मालवाहतूक करीत आहे.
नवी दिल्ली : कोविड-१९ च्या साथीच्या काळात दुधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रेल्वेने ‘रेल मिल्क टँक व्हॅन’ विकसित केली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या व्हॅनची क्षमता ४४,६६० लिटरची असून, आधीच्या व्हॅनपेक्षा ती १२ टक्के अधिक
आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात भारतीय रेल्वे आठवड्याचे सातही दिवस अखंडित मालवाहतूक करीत आहे. २४ मार्च २०२० ते २२ मे २०२० या काळात २३.२ लाख वाघिण्यांची वाहतूक करण्यात आली. यातील १३.५ लाख वाघिण्यांमधून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली.
यात दुधासह अन्नधान्ये, मीठ, साखर, खाद्यतेल आदी वस्तूंचा समावेश आहे. १ एप्रिल २०२० ते २२ मे २०२० या काळात ९.७ दशलक्ष टन धान्याची वाहतूक रेल्वेने केली. आदल्या वर्षी या काळात ४.६ दशलक्ष टन धान्याची वाहतूक करण्यात आली होती.
दुधाची वाहतूक होणार अधिक वेगाने
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, ‘रेल मिल्क टॅँक व्हॅन’ पूर्णत: स्वदेशी बनावटीची असून, ती ताशी ११० कि. मी. वेगाने धावू शकते. तिचा अंतर्भाग पूर्णत: स्टेनलेस स्टीलचा आहे. या व्हॅनमुळे दुधाची वाहतूक अधिक सुरक्षित, परवडणारी आणि गतिमान होईल.