भारतीय रेल्वेचे खासगीकरण? रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 06:03 PM2019-11-22T18:03:48+5:302019-11-22T18:32:36+5:30
'रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे'
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढेही राहील, असे सांगत पीयूष गोयल यांनी भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
केंद्र सरकार भारतीय रेल्वेचे खासगीकरण करत नाही. मात्र, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत कमर्शियल आणि ऑन-बोर्ड सेवांसाठी आऊटसोर्सिंग करत आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. राज्यसभेत यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, "भारतीय रेल्वेसाठी पुढील 12 वर्षांत अंदाजे स्वरुपात 50 लाख कोटी रुपयांचा निधी सरकार जमा करू शकणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे पाऊले उचलली जात आहेत. आमचे उद्दिष्ट प्रवाशांना चांगल्या सेवा आणि फायदा देण्याचे आहे. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचे नाही. भारतीय रेल्वे भारत आणि भारतीयांची संपत्ती आहे आणि यापुढे सुद्धा राहील."
प्रवाशांची वाढती गर्दी पाहून यावर उपाय म्हणून हजारो नवीन ट्रेन आणि जास्तीत जास्त गुंतवणूक यांचा उल्लेख करत पीयूष गोयल म्हणाले, '"जर खासगी कंपन्या रेल्वेत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतील आणि सध्याची प्रणाली चालू ठेवतील तर यामध्ये ग्राहक आणि प्रवाशांना फायदाच होईल."