क्रेनपाठाेपाठ काेसळला रेल्वेपूल; १८ जण ठार; मिझोरमच्या ऐझवालमध्ये भीषण दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 06:38 AM2023-08-24T06:38:01+5:302023-08-24T06:38:17+5:30
दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
ऐझवाल : मिझोरमच्या ऐझवालमध्ये बुधवारी निर्माणाधीन रेल्वेपूल कोसळल्याने १८ मजूर ठार झाले तर पाच अद्याप बेपत्ता आहेत. सायरंग परिसरात सकाळी १० वाजता झालेल्या या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेले बहुतांश पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करीत प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना दोन लाखांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजारांची भरपाई देण्याची घोषणा केली.
दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
गॅन्ट्री (एक प्रकारची क्रेन) कोसळल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वेने सांगितले. भैरवी-सैरंग नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाअंतर्गत १३० पुलांपैकी एक असलेल्या या निर्माणाधीन पुलाशी संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.