Railway Budget 2025: रेल्वेची गाडी जुन्याच रुळावरून धावणार, किती कोटींची तरतूद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 09:07 IST2025-02-02T09:06:18+5:302025-02-02T09:07:43+5:30
Budget 2025 Railway Allocation: रेल्वेची नवीन लाईन टाकण्यासाठी ३२,२३५ कोटी रुपये आणि लाईन दुपदरीकरणासाठी ३२,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Railway Budget 2025: रेल्वेची गाडी जुन्याच रुळावरून धावणार, किती कोटींची तरतूद?
-महेश घोराळे
यंदाच्या अर्थसंकल्पात सलग दुसऱ्या वर्षी भारतीय रेल्वेसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नाही. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारतीय रेल्वेला २.५२ लाख कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे. मागील अर्थसंकल्पातही हाच आकडा होता. रेल्वे क्षेत्राबाबत, सुरक्षेवर आणि गाड्यांना वीज जोडण्याची प्रक्रिया वेगवान करण्यावर भर देण्यात आला आहे.
रेल्वेची नवीन लाईन टाकण्यासाठी ३२,२३५ कोटी रुपये आणि लाईन दुपदरीकरणासाठी ३२,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच गेज लाईन बदलण्यासाठी ४,५५० कोटींचे बजेट देण्यात आले आहे.
याशिवाय अपघात टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये सिग्नल आणि टेलिकॉम सिस्टीमसाठी सहा हजार कोटींहून अधिक तरतूद करण्यात आली आहे. वीज वाहिन्यांवर ६,१५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे कर्मचारी कल्याण, त्यांचे प्रशिक्षण, रेल्वे सुरक्षा निधी यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.
कवचचे अपग्रेडेशन
अर्थसंकल्पात रेल्वेबाबत नवीन घोषणा करण्याऐवजी, पूर्वीच्या घोषणा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी कवच प्रणालीचे अपग्रेडेशन केले जाईल. रेल्वे मार्गावर त्याचे ४.० व्हर्जन लागू करण्याचे काम जलदगतीने केले जाईल. यामध्ये रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टँईडस ऑर्गनायझेशनकडून मान्यता मिळाली आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावरही कवच सिस्टीम बसविल्या जातील.
१०० अमृत भारत एक्सप्रेस गाड्या
पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार. त्यांनी रेल्वेच्या वाढीसाठी मोठे पाठबळ दिले आहे. रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपये अर्थसंकल्पीय सहाय्य आहे. ही बाब खरोखरच गरजेची होती. रेल्वे जाळ्याचा विस्तार होत असून आधुनिक प्रकारच्या गाड्या आणल्या जात आहेत आणि त्याचवेळी सुरक्षिततेवरही भर दिला जात आहे. एकूण नवीन प्रकल्प पाहिले तर सुमारे १०० नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या तयार केल्या जातील. तसेच ५० नमो भारत ट्रेन, सुमारे २०० वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. -अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री
विशेष गुंतवणूक किती तरतूद ?
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, संयुक्त उपक्रम आणि विशेष उद्देशाची वाहने यासाठीच्या गुंतवणूकीसाठी २२,४४४ कोटींची तरतूद केली आहे.