Indian Railway Smart Work: कहरच केला...! कंत्राटदाराने नवा ट्रॅक टाकला, विद्युत विभागाने तर मधोमधच पोल उभारला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 09:19 AM2022-08-25T09:19:01+5:302022-08-25T09:19:21+5:30
हास्यास्पद प्रकार! त्याहीपुढचा कहर म्हणजे रेल्वे म्हणते असेच काम चालते...रेल्वेनुसार काम नीट सुरु आहे, यामध्ये कोणतीही चूक झालेली नाही.
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात रेल्वेच्या तिसऱ्या ट्रॅकचे काम सुरु आहे. यावेळी एक विचित्र प्रकार घडला आहे. नव्या ट्रॅकच्या मधोमधच इलेक्ट्रीक कंत्राटदाराने विजेचा पोल उभा केला आहे. लोक हे फोटो व्हायरल झाल्यावर रेल्वेच्या स्मार्ट इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असल्याचे म्हणत खिल्ली उडवत आहेत. तर रेल्वेचे अधिकारी असेच काम चालते असे म्हणत आहेत.
रेल्वेनुसार काम नीट सुरु आहे, यामध्ये कोणतीही चूक झालेली नाही. बीना-कटनी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या नव्या ट्रॅकचे काम सुरु आहे. रेल्वेने नरयावली ते ईसरवाराच्यामध्ये साडेसात किमीच्या रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी असा कारनामा केला आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने सांगितले की, रेल्वेचा ट्रॅक कंत्राटदाराने टाकला आहे, तर इलेक्ट्रीक विभागाने त्याच्या मधोमध विजेचा खांब उभा केला आहे. यामुळे आता नव्या ट्रॅकला एक किमीपर्यंत बाजुला सरकवावे लागणार आहे. कारण त्याच्या मध्येच पोल उभा करण्यात आला आहे आणि इलेक्ट्रीक विभागाचा कंत्राटदार तो हटविण्यास तयार नाहीय.
धक्कादायक बाब म्हणजे, असा प्रकार दोन ठिकाणी झाला आहे, एक ठिकाण तर अगदी रेल्वे स्थानकाच्या पाठीमागेच आहे. दोन्ही विभागांमध्ये समन्वय असायला हवा होता. परंतू, चूक झाली ती झाली ती मान्य करण्यासही रेल्वे तयार नाहीय. आता तर हे अधिकारी रेल्वे स्थानकाची इमारत आणि ट्रॅकच हटविण्याचा विषय बोलत आहे. या साऱ्या प्रकारत रेल्वेचा पैसा मात्र वाया जाणार आहे.
झाले असे की, कंत्राटदाराने मध्यवर्ती ट्रॅकशी अलायमेंट जुळविली नाही आणि त्या ट्रॅकपासून तीन ते पाच मीटर अंतरावर नवा ट्रॅक उभा केला. विद्युत विभागाने तर त्यापुढचा कहर केला. त्यांनी विजेचा पोल थोडा बाजुला घेऊन ट्रॅक कंत्राटदाराने उभी केलेली समस्या दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतू त्याने नमते न घेता ट्रॅकच्या मध्येच पोल उभा केला. इसरवारा स्थानकाजवळही हाच प्रकार झाला आहे.