११ एप्रिलपासून रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप?
By admin | Published: February 17, 2016 03:08 AM2016-02-17T03:08:05+5:302016-02-17T03:08:05+5:30
सातव्या वेतन आयोगात असणाऱ्या शिफारसींमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतनवाढ मिळणार नाही. यावर रेल्वे मंत्रालयाकडूनही योग्य तोडगा काढण्यात आलेला नसल्याने अखिल भारतीय
मुंबई : सातव्या वेतन आयोगात असणाऱ्या शिफारसींमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतनवाढ मिळणार नाही. यावर रेल्वे मंत्रालयाकडूनही योग्य तोडगा काढण्यात आलेला नसल्याने अखिल भारतीय रेल्वेमेन्स फेडरेशनने ११ एप्रिलपासून संपाची हाक दिली आहे. या संपासंदर्भात रेल्वे युनियनकडून घेण्यात आलेल्या गुप्त मतदानात ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. याविषयी ११ मार्च रोजी रेल्वे मंत्रालयाला निवेदन देण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती फेडरेशनकडून देण्यात आली.
रेल्वेत सध्याच्या सर्वांत खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ७ हजार असून, ती वाढवून २६ हजार रुपये करावी अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु सातव्या वेतन आयोगात १८ हजार रुपये एवढी वेतनश्रेणी असल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनसह अन्य रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे. सध्याचे सरकार चर्चेच्या तयारीत नसल्यामुळे संपाचे हत्यार उपसण्यात येत असल्याचे अखिल भारतीय रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)