Railway Accident: रेल्वे कवच फेल? दोन मालगाड्या समोरसमोर आदळल्या; मोटरमन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:44 AM2023-02-16T08:44:41+5:302023-02-16T08:45:37+5:30
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
सुलतानपूर : उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. जवळपास अर्धा डझन डबे रुळावरून घसरले आहेत. दोन्ही मालगाड्यांचे इंजिन खराब झाले आहे.
या अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, रेल्वे अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. सुलतानपूर जंक्शनजवळ लखनऊ आणि वाराणसीहून येणाऱ्या दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत मालवाहू गाड्यांचे इंजिन खराब झाले आहे. या घटनेनंतर लखनौ-वाराणसी-अयोध्या आणि प्रयागराज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
काय आहे रेल्वे कवच...
कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो. साधारण वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी या यंत्रणेची चाचणी घेतली होती.