video : "शांत...एकदम शांत बसा...", विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:59 PM2024-08-01T15:59:50+5:302024-08-01T16:00:39+5:30
विरोधी खासदारांनी 'रीलमंत्री' म्हणताच शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली.
Ashwini Vaishnaw Speech:रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या लोकसभेतील भाषणादरम्यान गुरुवारी (1 ऑगस्ट) प्रचंड गदारोळ झाला. सरकारने रेल्वेमध्ये केलेल्या सुधारणांबाबत वैष्णव माहिती देत होते, यावेळी विरोधी खासदारांनी त्यांना 'रीलमंत्री' म्हणत टोमणा मारला. हे ऐकून शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली.
आम्ही रील बनवणारे नाही...
काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही फक्त रील बनवणारे नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत. इथे जी लोकं ओरडत आहेत, त्यांनी सांगावे की, काँग्रेसने 58 वर्षांच्या सत्तेत एक किलोमीटर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) का बसवले नाही? यावेळी गदारोळा करणाऱ्या खासदारांवर संतापून "शांत बसा, एकदम शांत बसा...काहीही बोलतात..." असे म्हणत रेल्वेमंत्र्यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले.
#WATCH | While speaking in Lok Sabha, Union Minister for Railways, Ashwini Vaishnaw says, "We are not the people who make reels, we do hard work unlike you people who make reels for show off..."
— ANI (@ANI) August 1, 2024
The railway minister says, "The average working and rest times of Loco pilots are… pic.twitter.com/gL2sFgWWZt
हा देश असा चालेल का - अश्विनी वैष्णव
रेल्वेमंत्री पुढे म्हणतात, आज आमच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी सांगावे की, ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना देशातील रेल्वे अपघाताचा आकडा 0.24 वरून 0.19 वर आला होता, तेव्हा हे लोक सभागृहात टाळ्या वाजवायचे आणि हा आकडा 0.19 वरुन 0.03 वर आल्यावर आरोप करतात. हा देश असा चालणार का? काँग्रेसवाले सोशल मीडियावर आपल्या ट्रोल आर्मीच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवतात. अयोध्येत स्टेशनची जुनी भिंत कोसळली, तेव्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने खोटी माहिती पसरवली. अशा खोटेपणाने देश कसा चालेल? दोन कोटी प्रवासी रोज प्रवास करतात. त्यांच्या मनात भीती बसवायची आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
#WATCH | While speaking in Lok Sabha, Union Minister for Railways, Ashwini Vaishnaw says, "Those who are shouting here must be asked in their 58 years of being in power why they were not able to install Automatic Train Protection (ATP), even 1 km. Today, they dare to raise the… pic.twitter.com/1f66YxBspV
— ANI (@ANI) August 1, 2024
सरकारने अपघात रोखण्यासाठी काय केले?
रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, अपघात रोखण्यासाठी देशभरात मानवरहित रेल्वे क्रॉसिंग तयार करण्यात आले आहेत. स्टेशन्सचे संपूर्ण नियंत्रण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगद्वारे केले जाते. 1980-90 च्या दशकात जगातील मोठ्या देशांमध्ये याची सुरुवात झाली. काम संथ गतीने सुरू होते. 2014 मध्ये सरकार आल्यानंतर आम्ही 2015 मध्ये एटीपी विकसित करण्याचा संकल्प केला आणि 2016 मध्ये कवचच्या चाचण्या सुरू झाल्या. कोविड असूनही 2020-21 मध्ये विस्तारित चाचण्या घेण्यात आल्या. देशात सुमारे 70 हजार किलोमीटरचे रेल्वे नेटवर्क आहे. अर्धे नेटवर्क असलेल्या देशांना एटीपी बसवायला जवळपास 20 वर्षे लागली. कवच बसवण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असे अश्वीनी वैष्णव म्हणाले.
गेल्या 15 दिवसांत 8 वेळा रेल्वे अपघात
सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे विरोधक रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. गेल्या 15 दिवसांत आठ रेल्वे अपघात झाले आहेत. फक्त जुलै महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 18 जुलै रोजी चंदीगड-दिब्रुगड रेल्वे अपघात झाला होता, ज्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 31 जण जखमी झाले होते. 19 जुलै रोजी गुजरातच्या वलसाडमध्ये मालगाडी रुळावरून घसरली, 20 जुलै रोजी यूपीच्या अमरोहा येथे मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले. 21 जुलै रोजी राजस्थानमधील अलवरमध्ये मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. 21 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील राणाघाट येथे मालगाडी रुळावरून घसरली होती. 26 जुलै रोजी भुवनेश्वर, ओडिशात मालगाडी रुळावरून घसरली, 29 जुलै रोजी बिहार संपर्क क्रांतीचे डबे बिहारच्या समस्तीपूरमध्ये वेगळे झाले आणि 30 जुलै रोजी हावडाहून मुंबईला जाणारी एक पॅसेंजर ट्रेन झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये रुळावरुन घसरली होती.