रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:29 IST2024-12-04T14:02:33+5:302024-12-04T14:29:46+5:30
Railway Minister Ashwini Vaishnaw : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लहान आणि मध्यम रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे, असे एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना अश्निनी वैष्णव म्हणाले.

रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
Railway Minister Ashwini Vaishnaw : नवी दिल्ली : देशात सर्वाधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचे प्रवासी भाडे सुद्धा सर्वात कमी आहे. बसच्या भाड्यापेक्षा ट्रेनचे भाडे खूपच स्वस्त आहे. रेल्वे भाडे कमी असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सरकारकडून प्रवासी भाड्यात दिले जाणारे अनुदान म्हणजेच सबसिडी. पण रेल्वे प्रवाशांना किती सबसिडी दिली जाते, हे तुम्हाला माहीत आहे का?
या प्रश्नाचे उत्तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत दिले. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक रेल्वे प्रवाशाला प्रवासाच्या तिकिटावर ४६ टक्के सबसिडी दिली जाते. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालय दरवर्षी प्रवाशांसाठी सबसिडीवर ५६,९९३ कोटी रुपये खर्च करते.
ज्येष्ठ नागरिक आणि मान्यताप्राप्त पत्रकारांना पूर्वी सबसिडी दिली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती बंद करण्यात आली आहे. मात्र, ही सबसिडी पुन्हा लागू केली जाणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. अशावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले, भारत सरकारने प्रवाशांना दिलेली एकूण सबसिडी ५६,९९३ कोटी रुपये आहे. प्रत्येक १०० रुपयांच्या प्रवासी सेवेची किंमत ५४ रुपये आकारली जाते. सर्व श्रेणीतील प्रवाशांना ४६ टक्के सबसिडी दिली जाते.
याचबरोबर, ज्याप्रमाणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश रस्त्यांनी जोडला गेला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लहान आणि मध्यम रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे, असे एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना अश्निनी वैष्णव म्हणाले. तसेच, देशातील रेल्वे स्थानक अपग्रेडेशनबाबत अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. सरकारने सर्वात मोठा रेल्वे स्टेशन अपग्रेडेशन कार्यक्रम सुरू केला आहे. सध्या देशभरात जवळपास १,३०० रेल्वे स्थानके अपग्रेड केली जात आहेत, असे अश्निनी वैष्णव यांनी सांगितले.