रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:58 PM2024-09-16T13:58:37+5:302024-09-16T13:59:06+5:30
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानातील अजमेर येथे रेल्वे अपघात घडवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रुळावर सिमेंटचा मोठा दगड ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. वारंवार समोर येणाऱ्या या घटनांनंतर आता भारतीय रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.
याबाबत आता रेल्वेमंत्र्यांनीही इशारा दिला आहे. न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केलं. यावेळी, ते म्हणाले की, मी त्यांना (कट रचणाऱ्यांना) स्पष्टपणे चेतावणी देतो. असे करणाऱ्या प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू. कोणत्याही परिस्थितीत दररोज प्रवास करणाऱ्या देशातील दोन कोटी प्रवाशांचे आम्ही जबाबदारीने संरक्षण करू. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणालाही खेळू देणार नाही. असा प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडू शकतो, त्यामुळं आपण सतर्क राहायला हवे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते. मात्र, सध्याच्या घडीला ४० अपघात झाले आहेत. पण तरीही रात्रंदिवस मेहनत करून स्ट्रक्चर बदलण्यावर इतका भर दिला आहे की, ती ४० ची संख्याही आणखी कमी होईल. आगामी काळात आम्ही अधिक जबाबदारीनं काम करू आणि प्रवाशांची सुरक्षा आणखी सुनिश्चित करणार आहोत.
याचबरोबर, छठच्या दिवशी घरी जाणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, जितक्या ट्रेन चालवल्या जातात, त्या सर्व भरलेल्या असतात. रेल्वेची क्षमता वाढवली जाईल. भारताने एका वर्षात स्वित्झर्लंडइतके रेल्वे ट्रॅक जोडले. दरवर्षी सात हजार डबे बनवले जात आहेत. क्षमता वाढवण्यावर जास्त भर आहे. पुढील १० वर्ष लक्ष केंद्रित असून रेल्वेचा संपूर्ण कायापालट होईल.