लोकमत हवाई सफर उपक्रमातील विद्यार्थ्यांसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मनसोक्त रमले

By Admin | Published: June 24, 2016 09:25 PM2016-06-24T21:25:00+5:302016-06-24T21:25:00+5:30

संसद भवनाजवळ रेल्वे मंत्रालयाचे प्रशस्त दालन. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची प्रमुख उपस्थिती.

Railway Minister Suresh Prabhu with students from Lokmat Air Travel Program | लोकमत हवाई सफर उपक्रमातील विद्यार्थ्यांसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मनसोक्त रमले

लोकमत हवाई सफर उपक्रमातील विद्यार्थ्यांसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मनसोक्त रमले

googlenewsNext

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली, दि. 24 - संसद भवनाजवळ रेल्वे मंत्रालयाचे प्रशस्त दालन. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची प्रमुख उपस्थिती. निमित्त लोकमत वृत्तपत्र समूह आयोजित शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची दिल्ली हवाई सफर. उपस्थित श्रोते व प्रश्नकर्ते होते सफरीत सहभागी झालेले महाराष्ट्र आणि गोव्याच्या प्रत्येक जिल्ह्यातले शालेय विद्यार्थी. रेल्वेमंत्री प्रभूंनी आपल्या बालवयातल्या आठवणींसह या मुलांसमोर व्यक्त केले भावपूर्ण मनोगत. पाठोपाठ विद्यार्थ्यांनी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना रेल्वेमंत्र्यांची मनमोकळी आणि दिलखुलास उत्तरेही मिळाली. देशाच्या राजधानीत क्वचितच जमणारी ही अनोखी मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. रेल्वेमंत्र्यांनी जवळपास तासभर मुलांशी संवाद साधला त्याचबरोबर लोकमतने आयोजित केलेल्या हवाई सफर उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
दैनंदिन कामकाजातून वेळात वेळ काढून या मैफलीत सहभागी झालेले सुरेश प्रभू लहान विद्यार्थ्यांमधे मनापासून रमले. मुलांशी संवाद साधतांना प्रभू म्हणाले, ‘मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा एकदाही मला दिल्लीला येण्याचा योग आला नाही. लोकमतने मात्र ही संधी लहान वयातच तुम्हाला उपलब्ध करून दिली. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. राजधानीतली ही संस्मरणीय भेट आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहील. पुन्हा दिल्लीला याल तेव्हा या भेटीच्या आठवणी जाग्या होतील आणि एका नव्याच शहराचे दर्शन त्यावेळी तुम्हाला घडेल. महाराष्ट्राविषयी आपल्याला सार्थ अभिमान जरूर आहे मात्र विविधतेने नटलेला भारत देश खूप मोठा आहे. देशातले वेगवेगळे प्रदेश तुम्हाला पहाता यावे यासाठी भारतीय रेल्वेने विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.’
सुरेश प्रभूंनी मनापासून केलेले स्वागत आणि उपरोक्त प्रास्ताविकानंतर हवाई सफरीतल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाच्या छटा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमधे जाणवत होत्या. ईशान्य भारतातल्या प्रत्येक राज्यात रेल्वे कधी पोहोचणार याची चिंताही एका विद्यार्थीनीने व्यक्त केली.


या अनोख्या मैफलीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि रेल्वेमंत्र्यांची उत्तरे त्यांच्याच शब्दात :
प्रश्न : मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दोन वर्षात मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी आपण कोणत्या विशेष सुधारणा केल्या?
उत्तर : मुंबईत दररोज ८0 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. शंभर वर्षांपूर्वी जी व्यवस्था लाखभर लोकांसाठी निर्माण झाली होती. तीच व्यवस्था अजूनही मुंबईत आपण वापरतो आहोत. साहजिकच लोकल प्रवाशांचे काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेत, याची मला जाणीव आहे. मुंबईतल्या लोकल वाहतुकीच्या सुधारणांसाठी केंद्र शासन २५ हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. त्यातून होणाऱ्या सुधारणांची यादी बरीच लांबलचक आहे. तथापि ठळक बाबी सांगायच्या झाल्या तर नव्या उड्डाणपुलांसह लोकलची प्रवासी वाहतूक वाढवणे. त्यासाठी नव्या इलेव्हेटेड मार्गांची निर्मिती, आदर्श स्थानके, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, तिकीटांसाठी वेंडिंग मशिन्स, लोकल डब्यांमधे आमुलाग्र परिवर्तन इत्यादी गोष्टींचाही त्यात उल्लेख करता येईल.
प्रश्न : मंत्रिमहोदय आपण कोकणच्या जनतेचे प्रतिनिधी आहात, कोकण रेल्वेचे भाग्य आपण कधी बदलणार? अजूनही कोकणातली रेल्वे दोन लोहमार्गापुरती सीमित आहे. कोकणातले प्रवासी वाहतुकीचे दळणवळण वाढवण्यासाठी या मार्गावर नवे लोहमार्ग व आणखी ट्रेन्स आपण कधी सुरू करणार?
उत्तर : कोकण रेल्वेमार्गावर सुधारणांचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी खास निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही कोकणापुरती मर्यादीत नसून पश्चिम व दक्षिण भारताच्या सागर तटाची जीवनवाहिनी आहे. कोकणच्या जनतेच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत, याची मला जाणीव आहे. आपल्या भागाचा विकास रेल्वेने अग्रक्रमाने करावा असे प्रत्येकाला वाटते. ते स्वाभाविकही आहे. तथापि रेल्वे मंत्रालयाला साऱ्या देशाच्या संतुलित विकासाचा विचार करावा लागतो. मर्यादीत उत्पन्नातून अनेक गोष्टी साधायच्या असतात. त्यामुळे आपल्या मनातले अग्रक्रम अनेकदा बदलावे लागतात.
प्रश्न : मुंबईचा विचार कायमच अग्रक्रमाने होतो. महाराष्ट्राचे काय? राज्यात अनेक लोहमार्ग वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यांचे काम कधी मार्गी लागणार?
उत्तर : महाराष्ट्रात रेल्वेचे काम वर्षानुवर्षे का रखडले याचे उत्तर भूतकाळात शोधावे लागेल. त्यावर मी बोलणे प्रशस्त ठरणार नाही. तथापि मुंबईसाठी २५ हजार कोटी खर्च होणार असतील तर तर महाराष्ट्रासाठी २९ हजार कोटींच्या खर्चाची विशेष तरतूद रेल्वे मंत्रालयाने केली आहे. पूर्वी प्रत्येक प्रकल्पाची मंजुरी दिल्लीत या रेल भवनाच्या इमारतीत होत असे. आता निर्णय प्रक्रियेचे आम्ही विकेंद्रीकरण केले आहे. राज्यातल्या कोणत्या लोहमार्गांना प्राधान्य द्यायचे हे महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी यांचे संयुक्त मंडळ ठरवील. या प्रक्रियेमुळे रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागतील अशी आशा आहे.
प्रश्न : रखडलेल्या लोहमार्गात अहमदनगर परळी वैजनाथ लोहमार्गही आहे. त्याला अग्रक्रम मिळेल काय?
उत्तर : नक्कीच. राज्याच्या अग्रक्रमात या लोहमार्गाचाही समावेश आहे. त्यासाठी तरतूदही केली आहे.
प्रश्न : मी बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईचा विद्यार्थी आमच्या गावाला रेल्वेच्या पुरेशा सोयी नाहीत. अंबेजोगाई स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी ३0 वर्षांपासून आम्ही लढतो आहोत. आमचे स्वप्न कधी पुरे होईल?
उत्तर :(अवघ्या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या तोंडून ३0 वर्षे आम्ही लढतो आहोत हे उद्गार ऐकल्यानंतर सुरेश प्रभूंना हसु आवरले नाही. या हास्यकल्लोळात सारेच मग सहभागी झाले.) प्रभू म्हणाले, गोपीनाथजी मुंडेंच्या दोन्ही कन्या अंबोजोगाईची बाजू विविध स्तरांवर आक्रमकपणे मांडत आहेत. अंबेजोगाई जिल्हा कधी होईल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे. तथापि रेल्वेच्या सोयी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील यात मी जरूर लक्ष घालीन.
प्रश्न : भारतात ठिकठिकाणी पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, यासाठी कालका सिमला, माथेरान येथे जशा नॅरो गेज टॉय ट्रेन्स आहेत, तशा आणखी नॅरो गेज ट्रेन्स सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे काय?
उत्तर : पूर्वी मोठे रस्ते नव्हते. त्याकाळी नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉडगेज असे लोहमार्गाचे तीन प्रकार होते. आता देशातले बहुतांश लोहमार्ग आम्ही ब्रॉड गेज करीत आहोत. पर्वतीय राज्ये आणि डोंगराळ भागात कालका सिमला एक्सप्रेस सारख्या नॅरो गेज ट्रेन अनेक वर्षांपूर्वी सुरू झाल्या. आता प्रत्येक ठिकाणी मोठे रस्ते झालेत. त्यामुळे ही मागणी कोणत्याही राज्यातून फारशी पुढे आलेली नाही. तरीही पर्यटन विकासासाठी तशा स्वरूपाची मागणी विविध राज्यांकडून आली तर त्याचा जरूर विचार करू.
प्रश्न : ईशान्य भारताच्या किती राज्यात रेल्वे पाहोचली? उरलेल्या राज्यात कधी पोहोचणार?
उत्तर : ईशान्य भारतात सिक्कीमसह ८ राज्ये आहेत. आसाम हे त्यातल्या त्यात मोठे राज्य. आठ पैकी ४ राज्यात भारतीय रेल्वेचे दळवणवळण सुरू आहे. अजून त्यातले बरेचसे प्राथमिक अवस्थेत आहे. त्यात बरीच भर घालावी लागणार आहे. मध्यंतरी मी अरूणाचल प्रदेश, गोहाटी, शिलाँग इत्यादी ठिकाणी स्वत: जाउन संभाव्य लोहमार्गांच्या आराखड्यांची पहाणी करून आलो. लवकरच मणिपूरला जाणार आहे. उर्वरित राज्यात रेल्वे पोहोचायला आणखी काही वर्षे तरी लागतील.
प्रश्न : तुमची आवडती मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी सुरू होणार?
उत्तर : २0२३ साली. मलाच काय साऱ्या देशाला या ट्रेनने प्रवास करायला आवडेल.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे शालेय विद्यार्थी अथवा विद्यार्थीनींची लोकमत वृत्तपत्र समुह आयोजित दिल्ली हवाई सफरीची संकल्पना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना मनापासून आवडली. लोकमत समुहाचे कल्पक चेअरमन विजय दर्डा यांचा प्रभूंनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. दिल्लीच्या हवाई सफरीचे हे चौथे वर्ष. यापूर्वीच्या ३ सफरीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती तर यंदाच्या वर्षी गृहमंत्री राजनाथसिंग आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या तासभराच्या भेटीचा योग विद्यार्थ्यांना आला. दिल्लीच्या रेल भवनात आयोजित कार्यक्रमात लोकमत वृत्तसमुहातर्फे रेल्वे मंत्र्यांचे स्वागत जाहिरात विभागाचे ज्येष्ठ अधिकारी आवारी यांनी केले. यावेळी लोकमतचे राजकीय संपादक सुरेश भटेवरा, विशेष प्रतिनिधी शीलेश शर्मा, नबिन सिन्हा, प्रमोद गवळी, परवीन भागवत आदी उपस्थित होते.

Web Title: Railway Minister Suresh Prabhu with students from Lokmat Air Travel Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.