आर्थिक अडचणींमुळे 2020-21मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार नाही?; PIBनं सांगितलं मेसेजमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 01:24 PM2020-08-23T13:24:23+5:302020-08-23T13:29:20+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार नसल्याचा मेसेज व्हायरल
नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. आता लॉकडाऊनमधील निर्बंध उठवण्यात आले असले तरी अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना २०२०-२१ मध्ये वेतन दिलं जाणार नाही, अशा आशयाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यात आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मेसेजची भर पडली आहे. पीआयबीनं यामागील सत्य सांगितलं आहे. 'रेल्वे मंत्रालयाचा २०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांना पगार किंवा पेन्शन न देण्याचा विचार नाही. अशा प्रकारचं कोणतंही पाऊल रेल्वेकडून उचलण्यात आलेलं नाही,' असं स्पष्टीकरण पीआयबीकडून देण्यात आलं आहे.
Claim- Railways has decided not to pay salaries to their employees in 2020-21 due to financial crunch.#PIBFactCheck- The claim is #False. No such move is being discussed or contemplated by @RailMinIndia. pic.twitter.com/eshYnDdTqO
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 22, 2020
कोरोना, त्याचा संसर्ग, लॉकडाऊन याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. अनेक जण कोणतीही खातरजमा न करता ते व्हायल करत आहेत. त्यामुळेच पीआयबीकडून फॅक्ट चेकच्या माध्यमातून खोट्या मेसेसची माहिती दिली जात आहे.
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ३० लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे ६९ हजार ८७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५५ हजार ७९४ वर गेला आहे.