रेल्वे प्रवाशांना मिळणार आता १० लाखांचा अपघात विमा!
By Admin | Published: July 25, 2016 04:15 AM2016-07-25T04:15:57+5:302016-07-25T04:15:57+5:30
प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे.
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे.
हा विमा ऐच्छिक असेल व त्यात प्रवाशास अपघातात मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याची सोय असेल. हा विमा एका तिकिटावर केल्या जाणाऱ्या एका वेळच्या प्रवासासाठी लागू असेल. याचबरोबर सामानाचाही विमा उतरविण्याची सोय रेल्वे उपलब्ध करून देणार आहे.
आॅनलाइन रेल्वे आरक्षणाची व्यवस्था पाहणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ या रेल्वेच्या उपक्रमामार्फत ही विमा योजना राबविण्यात येईल. यासाठी रेल्वेने सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी तीन कंपन्यांची निवड रीतसर टेंडर काढून करण्यात आली असून, त्यांच्याशी यासाठी करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शक्यतो आॅगस्ट महिन्यापासूनच ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
अशी विमा योजना सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प मांडताना केली होती.
येत्या महिन्यापासून ऐच्छिक सुविधा
सुरुवातीस आॅनलाइन रेल्वे
तिकिटे काढणाऱ्यांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार.
नंतर ती तिकीट खिडक्यांवरून तिकिटे व मासिक पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
हा विमा ऐच्छिक असल्याने आॅनलाइन तिकिटाचे बुकिंग करताना अगोदर विम्याच्या कॉलममध्ये प्रवाशाला आपली संमती नोंदवावी लागेल.
विमा हवा असा पर्याय
निवडल्यास तिकिटाच्या भाड्यासोबत विम्यासाठी द्यावी लागणारी रक्कमही त्यात आपोआप जोडली जाईल.
प्रीमियम किती असेल?
ई-तिकीट काढताना प्रवाशाला विमा हवा की नको, याचा पर्याय विचारला जाईल. विम्याच्या प्रीमियमची रक्कम प्रवासाचा वेळ व अंतर यावर अवलंबून असेल. विमा कंपनीची निवड केल्यावर तिच्याशी चर्चा करून विमा पॉलिसीचा तांत्रिक तपशील ठरविला जाईल.
तर ५० लाखांपर्यंतचे कवचही मिळेल
प्रवाशांना इच्छेनुसार विम्याची रक्कम वाढवून घेण्याचा पर्याय देण्याचाही विचार आहे. तूर्तास विम्याची कमाल रक्कम १० लाख ठरविली आहे. ही योजना कितपत यशस्वी होते हे पाहून प्रवाशांना हवा असल्यास त्यानुसार प्रीमियम घेऊन ५० लाखांचाही विमा दिला जाऊ शकेल. या खेरीज प्रवासात सामानाचाही विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
रेल्वे कायद्यानुसार प्रवासात मृत्यू झाल्यास रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरण यांच्याकडून चार लाखांची भरपाई मिळू शकते.
रेल्वे अपघात
२०१२-१३ १२३
२०१३-१४ ११८
२०१४-१५ १३५
२०१५-१६ १००
अपघातग्रस्थांना मदत
२०१२-१३ ३.१८ कोटी रु.,
२०१३-१४ १.४९ कोटी रु.,
२०१३-१४ १.२७ कोटी रु.
२०१५-१६ १.१ कोटी रुपये