एसी बिघडल्याने रेल्वेकडून प्रवाशाला 12 हजारांची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 04:19 PM2017-07-29T16:19:32+5:302017-07-29T16:23:48+5:30

ट्रेनमधील एसी खराब झाल्यामुळे प्रवाशाला झालेल्या मनस्तापाबद्दल 12 हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे

Railway to Pay 12 thousand rupees to passenger compensation for faulty ac | एसी बिघडल्याने रेल्वेकडून प्रवाशाला 12 हजारांची नुकसान भरपाई

एसी बिघडल्याने रेल्वेकडून प्रवाशाला 12 हजारांची नुकसान भरपाई

Next

बंगळुरु, दि. 29 - कर्नाटक राज्य ग्राहक विवाद तक्रार निवारण आयोगाने रेल्वेला ट्रेनमधील एसी खराब झाल्यामुळे प्रवाशाला झालेल्या मनस्तापाबद्दल 12 हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. साऊथ वेस्टर्न रेल्वेला 58 वर्षीय प्रवाशाला 10 हजारांची नुकसान भरपाई आणि तिकीटाचे दोन हजार रुपये रिफंड म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला आहे. एसी खराब झाल्याने आपल्याला तीन तासांचा प्रवास गुदमरत करावा लागल्याचं प्रवाशाने सांगितलं आहे. यावेळी अनेकदा त्यांना श्वासोच्छवास घेताना त्रास जाणवत होता. 

म्हैसूरमध्ये राहणारे डॉ शेखर एस बंगळुरुसाठी प्रवास करणार होते. यासाठी त्यांनी 9 मार्च 2015 रोजी टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचं तिकीट बूक केलं होतं. म्हैसूर ते बंगळुरु प्रवास तीन तासांचा होता. मात्र जेव्हा ते प्रवासासाठी आपल्या सी1 कोचमध्ये पोहोचले तेव्हा एसी बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळपणे एसी मेकॅनिकला कळवलं. 

मेकॅनिकने येऊन एसी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व व्यर्थ गेलं. यामुळे इतर प्रवाशांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागला. डॉ शेखर एस यांनी रेल्वेकडे यासंबंधी तक्रार करत आपल्याला रिफंड देण्याची मागणी केली. आपला हा प्रवास अत्यंत वाईट होता असंही त्यांनी सांगितलं. 

रेल्वेचं या तक्रारीवर म्हणणं होतं की, ट्रेन सुरु झाली तेव्हा एसी एकदम व्यवस्थित काम करत होता. मात्र बंगळुरुला पोहोचल्यानंतर तो खराब झाला. एवढ्या कमी वेळात तो ठीक करणं शक्य नव्हतं. 

ग्राहक मंचाने प्रवाशाला तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि दोन हजार रुपये रिफंड देण्याचा आदेश दिला होता. सोबतच एका दिवसामागे 100 रुपये असाही दंड ठोठावण्यात आला होता. मात्र प्रवाशाने नुकसान भरपाई जास्त हवी असल्याचं सांगत 15 हजार रुपयांची मागणी केली. यासाठी त्यांनी कर्नाटक राज्य ग्राहक विवाद तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. प्रवाशाचं वय पाहता आणि त्यांना झालेला त्रास लक्षात घेता आयोगाने 10 हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. रेल्वेला चार आठवड्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Web Title: Railway to Pay 12 thousand rupees to passenger compensation for faulty ac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.