रेल्वेच्या जनसंपर्काचे काम खासगी पीआरओंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:45 AM2019-06-17T02:45:20+5:302019-06-17T02:45:31+5:30
मदतीसाठी जनसंपर्क व्यावसायिकही नेमणार
नवी दिल्ली : रेल्वेच्या जनसंपर्काची जबाबदारी आता खासगी क्षेत्रातून आलेल्या व्यावसायिकांकडून पार पाडली जाणार आहे. खासगी जनसंपर्क व्यावसायिकांची (पीआरओ) तुकडी राजधानी दिल्लीत, तसेच रेल्वेच्या देशभरातील विभागांमध्ये (झोन्स) हे काम करील. ही तुकडी नेमण्यासाठी रेल्वेने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
देशभरातील १८ झोन्सच्या प्रत्येकी एका मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यासह ७० अधिकारी रेल्वेसंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याचे काम करीत आहेत. आता १७ खासगी जनसंपर्क व्यावसायिक प्रत्येक झोनमध्ये त्यांना साह्य करण्यासाठी नेमले जातील.
प्रत्येक झोनमध्ये आमच्यासाठी खासगी संस्था आधीच काम करीत असून त्या प्रसिद्धीसाठी आम्हाला मदत करीत असतात. आता आम्हाला प्रक्रियेला प्रमाणबद्ध करायचे आहे, असे रेल्वे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. त्यामुळेच खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.
या १७ प्रशिक्षित व्यावसायिकांच्या तुकडीत त्यांचा प्रमुख (टीम लीडर), समाजमाध्यम व्यवस्थापक, कंटेंट अॅनालिस्ट, कंटेंट रायटर्स, व्हिडीओ एडिटर्स व इतरांचा समावेश असेल. प्रत्येक झोनमध्ये अशी तुकडी काम करील व प्रत्येक तुकडीची सेवा घेण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च येईल.