प्लास्टिकपासून तयार केलेल्या डिझेलवर धावणार रेल्वे
By admin | Published: May 31, 2015 07:21 PM2015-05-31T19:21:16+5:302015-05-31T19:21:16+5:30
स्टेशन परिसरात पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल, कप, पिशव्या ही रेल्वेला भेडसावणारी नेहमीचीच समस्या, मात्र आता याच प्लास्टिकच्या कच-यामुळे रेल्वे धावली तर...
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - स्टेशन परिसरात पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल, कप, पिशव्या ही रेल्वेला भेडसावणारी नेहमीचीच समस्या, मात्र आता याच प्लास्टिकच्या कच-यामुळे रेल्वे धावली तर... अशक्यप्राय वाटणारे हे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. विज्ञान व औद्योगिक संशोधन केंद्र (सीएसआयआर) व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेसाठी प्लास्टिकपासून डिझेल निर्मितीचा प्रकल्प राबवला जाणार असून यासंदर्भात रेल्वेच्या अधिका-यांसोबत चर्चा सुरु आहे.
डेहराडूनमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आयआयपी) या संस्थेने काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या कच-यापासून पेट्रोल व डिझेल निर्मितीचा प्रकल्प यशस्वीरित्या करुन दाखवला होता. यात प्लास्टिकवर विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रीया करुन डिझेलची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र नियमानुसार या डिझेलची खुल्या बाजारात विक्री करण्यावर बंदी आहे. आता रेल्वेने स्वतःच्या वापरासाठीच हा प्रकल्प राबवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सीएसआयआर, आयआयपी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये आत्तापर्यंत तीन बैठका झाल्या असून ३ जूनला चौथी बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई, दिल्ली, जयपूर या तीन पैकी एका ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाईल. एक टनापेक्षा अधिक प्लास्टिक कचरा निर्माण होणा-या रेल्वे स्टेशनजवळच हा प्रकल्प उभारावा लागेल. या प्रकल्पातून निर्माण होणारे डिझेल युरो - ४ मानदंडाची पूर्तता करणारे आहे असा दावा आयआयपीतील वैज्ञानिकांनी केला. सध्याच्या डिझेलपेक्षा या प्रकल्पातून येणारे डिझेल काहीसे महागडे असले तरी कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जो खर्च होतोय त्यावर लगाम बसेल अशी आशा वैज्ञानिकांनी व्यक्त केली.