आता ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही करता येणार प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 02:47 PM2018-06-03T14:47:15+5:302018-06-03T14:47:15+5:30
रेल्वेचे ऑनलाइन बुक केलेले तिकीत कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी प्रवास रद्द करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल. मात्र आता तुम्हाला ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही...
नवी दिल्ली - रेल्वेचे ऑनलाइन बुक केलेले तिकीत कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी प्रवास रद्द करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल. मात्र आता तुम्हाला ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही काउंटरवरून खरेदी केलेल्या तिकिटाप्रमाणेच प्रवास करता येणार आहे. या संदर्भातील दिल्ली हायकोर्टाचा 2014 साली दिलेला आदेश पुन्हा एकदा लागू झाला आहे. कारण या आदेशाविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
काऊंटर तिकीट आणि ई तिकीट घेणाऱ्या प्रवाशांमध्ये भेदभाव होऊ नये यासाठी रेल्वेने सहा महिन्यांच्या आत पावले ऊचलावीत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने 2014 साली दिले होते. मात्र या आदेशांविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
फायनल चार्ट बनल्यानंतरही ज्या प्रवाशांचे ई तिकीट वेटिंगमध्ये राहते. त्यांचे तिकीट आपोआप रद्द होते. मात्र ज्यांनी तिकीट खिडकीवरून वेटिंगचे तिकीट घेतले आहे अशा प्रवाशांना प्रवास करता येतो. तसेच रिकामी सिट असेल तर त्यावरून प्रवासही करता येतो. याविरोधात वकील विभाष झा यांनी आवाज उठवला होता.
दरम्यान, या आदेशाबाबत प्रतिक्रिया देताना रेल्वे प्रशासनाने सांगितले की, न्यायालयाचा संपूर्ण आदेश वाचल्यानंतर आम्ही याबाबत पावले उचलणार आहोत. सध्या 75 टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट खरेदी करतात. दिल्ली हायकोर्टाने आपल्या निकालामध्ये सांगितले होते की, चार्ट बनल्यानंतरही वेटिंगवर असलेले ई तिकीट ऑटोमॅटिक रद्द होऊ नयेत. तर संबंधित प्रवाशाला ई तिकीट बुकिंगच्यावेळीच त्यासंदर्भातील पर्याय उपलब्ध व्हावा.