छतावरील प्रवासाची जबाबदारी रेल्वेची
By admin | Published: July 7, 2016 04:01 AM2016-07-07T04:01:38+5:302016-07-07T04:01:38+5:30
एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही
नवी दिल्ली : एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही ही रेल्वे थांबू शकली नाही.
मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. भरपाई देण्यातून मुक्त करावे ही रेल्वेची याचिकाही खंडपीठाने फेटाळली. रेल्वेच्या छतावर मोठ्या संख्येने बसलेल्या लोकांना रेल्वे वेगात जाताना असा अपघात होऊ शकतो याची जाणीव असलीच पाहिजे. छतावर बसलेल्या लोकांनी अपघाताला हातभार लावला असला तरी रेल्वे प्रशासनाला दोषमुक्त करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. हा अपघात एक फेब्रुवारी २०११ रोजी बरेलीहून निघालेल्या जम्मू तावी-हावडा हिमगिरी एक्स्प्रेसला झाला. भारत- तिबेट सीमा पोलीस दलातील (आयटीबीपी) भरतीच्या निवडीसाठी लाखो तरुण आले होते. प्रचंड संख्येतील या जमावाला हाताळणे अवघड झाल्यानंतर आयटीबीपी अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. पर्यायाने निवड रद्द करण्यात आली. हे तरुण मग घरी जाण्यासाठी त्या दुर्दैवी रेल्वेत चढले. अनेक जण छतावरही गेले. रेल्वे दर तासाला ६० किलोमीटर या वेगाने प्रवास करीत होती. अपघात शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. तेथे रेल्वेचे छत आणि फूट ओव्हर ब्रीज यांच्यातील अंतर तीन मीटरपेक्षाही कमी होते. अपघात झाल्यानंतरही रेल्वे तीन किलोमीटर पुढे गेली व नंतर थांबली. तेथे मग रक्ताळलेल्या छतावरून मृत तरुणांचे मृतदेह खाली घेण्यात आले.