धुरांच्या रेषा हवेत काढी.. आता भाडे तत्वावर तुम्हीही चालवू शकता ट्रेन!, रेल्वेचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 05:45 PM2021-11-23T17:45:10+5:302021-11-23T17:46:59+5:30
देशभरात धावणार १८० भारत गौरव ट्रेन; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं प्रवाशांना आता एक खास ऑफर दिली आहे. नव्या योजनेच्या अंतर्गत कोणतंही राज्य किंवा व्यक्ती ट्रेन भाड्यानं घेऊ शकतं. या ट्रेन्सना 'भारत गौरव ट्रेन' असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या अंतर्गत ट्रेन भाड्यानं घेण्यासाठी काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्याबदल्यात रेल्वे किमान भाडं वसूल करेल.
देशात सध्या १८० भारत गौरव ट्रेन चालवण्याची योजना आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक कोचेस असतील. रेल्वेनं यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
भारत गौरव ट्रेनचं संचालन खासगी क्षेत्र आणि आयआरसीटीसी या दोघांकडून केलं जाऊ शकतं. टूर ऑपरेटरकडून ट्रेनचं तिकीट ठरवतील. या ट्रेन्स भारताची संस्कृती, वारसा दाखवणाऱ्या संकल्पनेवर आधारित असतील. प्रवासी, माल वाहतूक यातून मोठा महसूल मिळवणाऱ्या रेल्वेनं आता पर्यटनावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन योजनेची घोषणा केली. 'स्टेकहोल्डर्स या ट्रेन्सला मॉडेल बनवतील आणि चालवतील. या ट्रेन्सची देखभाल, पार्किंग आणि अन्य सुविधांचं काम रेल्वेकडे असेल. ही रेल्वे सेवा नियमित ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. भारतातील पर्यटनाला चालना देणं हा या रेल्वेमागील मुख्य उद्देश आहे,' असं वैष्णव यांनी सांगितलं.