शेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 2, 2020 11:34 AM2020-12-02T11:34:32+5:302020-12-02T11:37:42+5:30
2 डिसेंबर म्हणजे आज नांदेड- अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02715)देखील नवी दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या 7 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा परिणाम आता रेल्वे सेवांवरही होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने अमृतसर आणि पंजाबमधील अनेक महत्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्या शार्ट टर्मिनेट, शॉर्ट ओरिजिनेट तसेच काही गाड्यांचा मार्गही बदलला आहे.
या रेल्वेगाड्या करण्यात आल्या रद्द -
उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबरपासून सुरू होणारी अजमेर-अमृतसर एक्सप्रेस स्पेशल ट्रेन (09613) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन डिसेंबरपासून सुरू होणारी अमृतसर-अजमेर स्पेशल ट्रेन (09612)देखील रद्द करण्यात आली आहे. 3 डिसेंबरपासून सुरू होणारी 05211 दिब्रूगड-अमृतसर एक्सप्रेस स्पेशल ट्रेनदेखील रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 3 डिसेंबरपासून सुरू होणारी 05212 अमृतसर-दिब्रूगड विशेष रेल्वेदेखील रद्द करण्यात आली आहे.
या रेल्वे गाड्या करण्यात आल्या शॉर्ट टर्मिनेट -
भटिंडा-वाराणसी-भटिंडा एक्सप्रेस (04998/04997) विशेष रेल्वेगाडीदेखील पुढील आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच 2 डिसेंबर म्हणजे आज नांदेड- अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02715)देखील नवी दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. याशिवाय आजपासून सुरू होणारी बांद्र टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02925) चंदीगडमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
या रेल्वेगाड्याचा मार्ग बदलला -
दोन डिसेंबरपासून सुरू होणारी अमृतसर-जयनगर एक्सप्रेस (04650/74) अमृतसर तरनतारन- ब्यास मार्गे वळवण्यात आली आहे. दुर्ग-जम्मू तवी एक्सप्रेस (08215) लुधियाना जालंधर कँट-पठानकोट छावनी मार्गे वळविण्यात आली आहे. या शिवाय, 4 डिसेंबरपासून सुरू होणारी रेल्वेगाडी जम्मू तवी-दुर्ग एक्सप्रेस (08216) पठानकोट कँट-जालंधर कँट-लुधियाना मार्गे वळवण्यात आली आहे.
रेल्वेसेवा बाधित झाल्याने रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान -
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी म्हटले आहे, की रेल्वे ऑपरेटिंग गेल्या दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली होती. तसेच 32 किलो मीटर अंतर सोडून मुख्य मार्गांवर रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू होती. ते म्हणाले, 23 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरदरम्यान 94 प्रवासी रेल्वेगाड्यांनी पंजाबमध्ये प्रवेश केला. तर 78 गाड्या राज्यातून बाहेर गेल्या. एवढेच नाही, तर 384 माल असलेल्या तसेच 273 रिकाम्या रेल्वेगाड्यांनीही राज्यात प्रवेश केला आहे. तसेच 373 माल असलेल्या आणि 221 रिकाम्या मालगाड्या राज्यातून बाहेर गेल्या आहेत.
तत्पूर्वी, रेल्वेने म्हटले होते, की रेल्वे सेवा बाधित झाल्याने त्यांना 2,220 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर मंगळवारी सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांत झालेली बैठक यशस्वी झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसत आहे.