रेल्वेचा स्पेनच्या टॅल्गो कंपनीशी फेब्रुवारीअखेर करार?
By admin | Published: January 21, 2017 05:17 AM2017-01-21T05:17:05+5:302017-01-21T05:17:05+5:30
टॅल्गो ट्रेन नफ्याच्या भागीदारीच्या भाडेतत्त्वावर भारताच्या प्रमुख रेल्वेमार्गांवर धावण्याची शक्यता नव्या फॉर्म्युल्यामुळे पुन्हा दृष्टिपथात आली आहे
सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- ताशी २00 कि.मी. वेगाने धावणारी स्पेनची बहुचर्चित टॅल्गो ट्रेन नफ्याच्या भागीदारीच्या भाडेतत्त्वावर भारताच्या प्रमुख रेल्वेमार्गांवर धावण्याची शक्यता नव्या फॉर्म्युल्यामुळे पुन्हा दृष्टिपथात आली आहे. अपेक्षेनुसार फेब्रुवारीअखेरपर्यंत रेल्वे मंत्रालय व टॅल्गो कंपनी यांच्यात तसा करार होईल आणि मार्चपर्यंत शताब्दीच्या मार्गांवर टॅल्गो ट्रेन धावू लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी प्रवाशांची सुरक्षा व प्रवासासाठीचा वेळ यांच्या साऱ्या चाचण्या टॅल्गोने पूर्ण केल्या होत्या. रेल्वेच्या पायाभूत सोयींमधे बदल न करता स्पेनहून भारतात आलेली टॅल्गो ट्रेन मोरादाबाद ते मथुरा ताशी ८0 ते ११५ कि.मी. वेगाने व मथुरा-पलवल मार्गावर ताशी १६0 ते २00 कि.मी. वेगाने धावली होती.
या चाचण्यांसाठी रेल्वेला कोणताही खर्च करावा लागला नव्हता. परीक्षण यशस्वी झाल्यानंतर टॅल्गो ट्रेन रुळांवर उतरवण्याऐवजी रेल्वेने कंपनीशी करार करण्याबाबत अचानक काही कारणांमुळे हात आखडते घेतले.
प्रचंड वेगात तीव्र वळणांवर रेल्वे कोच वाकण्याचे (टिल्टेड) तंत्रज्ञान जगात फक्त टॅल्गाकडे आहे. या तंत्रज्ञानामुळे तीव्र वळणांवरही टॅल्गो ट्रेनला वेग कमी करावा लागत नाही व रुळांवरून ट्रेन घसरण्याची भीतीही नसते. पण टॅल्गोच्या कोचेसचे फ्लोअर्स भारतीय रेल्वे कोचेसच्या तुलनेत थोडे खाली असल्याने प्लॅटफॉर्म व कोच यात अंतर पडते.