प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतून रेल्वेला मिळाले १४00 कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:40 PM2017-08-05T23:40:33+5:302017-08-05T23:40:51+5:30
रेल्वेला प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांतून मोठा महसूल तर मिळतोच, पण प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतूनही रेल्वे प्रशासनाने वर्षभरात म्हणजे २0१६-१७ या आर्थिक वर्षांत
नवी दिल्ली : रेल्वेला प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांतून मोठा महसूल तर मिळतोच, पण प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतूनही रेल्वे प्रशासनाने वर्षभरात म्हणजे २0१६-१७ या आर्थिक वर्षांत तब्बल १४00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कात करण्यात आलेली वाढ हे त्यामागील मोठे कारण आहे, असे स्पष्ट झाले आहे.
अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दोन ते तीन महिने आधी तिकिटे काढून ठेवतात आणि काही ना काही कारणास्तव शेवटच्या क्षणी प्रत्यक्षात जाणे शक्य नसल्याने ती रद्द करण्याची पाळी त्यांच्यावर येते. त्यातून रेल्वेने मोठा महसूल मिळवायला सुरुवात केली आहे. तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्याचाच फायदा म्हणून वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई रेल्वेला झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेमध्ये रेल्वेच्या या मोठ्या कमाईची माहिती दिली.
नोव्हेंबर २०१५ मध्ये तिकीट कॅन्सलेशन फीमध्ये वाढ करण्यात आली. तेव्हापासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट प्रत्यक्ष प्रवासाच्या ४८ तास अगोदर रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९0 रुपये होते. याच पद्धतीने एसी २
टियरचे तिकिट रद्द केल्यास १00 रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. ही दुप्पट वाढ १४00 कोटी रुपयांच्या कमाईस कारणीभूत ठरली.
तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दल
रेल्वेने नोव्हेंबर २0१५ पासून प्रवाशांकडून ६0 रुपयांऐवजी १२0 रुपये आकारणेसुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३0 रुपयांऐवजी ६0 रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.
तात्काळमधूनही मिळते अधिक रक्कम
याशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर वा ठिकाणी अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तात्काळ या व्यवस्थेद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. रेल्वेला असा मिळणारा महसूल वेगळाच!
कोच आधीचे शुल्क नवीन शुल्क
एसी २ टियरचे १00 २००
एसी ३ टियरचे ९0 १८०
स्लीपर क्लासचे ६0 १२0