"रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ काढून टाका"; रेल्वे मंत्रालयाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:57 IST2025-02-21T12:47:23+5:302025-02-21T12:57:08+5:30
रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे.

"रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ काढून टाका"; रेल्वे मंत्रालयाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आदेश
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यादरम्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला (पूर्वीचे ट्विटर) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने एक्सला चेंगराचेंगरीतील मृतांचे व्हिडिओ असलेल्या २८५ सोशल मीडिया लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. डिसेंबरमध्ये थेट सोशल मीडिया लिंक्स काढण्याचे अधिकार मिळाल्यानंतर मंत्रालयाची ही पहिली मोठी कारवाई आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने एक्सला १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ असलेल्या २८५ सोशल मीडिया लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी नैतिक मानदंड आणि प्लॅटफॉर्मच्या कंटेटच्या धोरणाचा हवाला देऊन एक नोटीस जारी केली आहे आणि ३६ तासांच्या आत कारवाई करण्याची विनंती केली आहे. असे व्हिडिओ शेअर केल्याने सार्वजनिक अशांतता निर्माण होऊ शकते आणि रेल्वेच्या कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो, असं नोटीसमध्ये असे म्हटले आहे.
"हे केवळ नैतिक नियमांच्या विरोधात नाही तर एक्सच्या कंटेटच्या धोरणाचे देखील उल्लंघन करते, कारण असे व्हिडिओ अनावश्यक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण करू शकतात. सोशल मीडियावरील सामग्री भारतीय रेल्वेच्या कामकाजात व्यत्यय आणू शकते, विशेषत: जेव्हा ट्रेनमध्ये सध्या खूप गर्दी आहे," असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दिल्ली रेल्वे विभागाने १९ फेब्रुवारी रोजी नवीन प्रोटोकॉल लागू केला आहे. या अंतर्गत कोणत्याही ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ८ ते १६ वर येण्याची परवानगी देण्यापूर्वी स्टेशन अधिकाऱ्यांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची परवानगी घ्यावी लागेल. प्रयागराज, पाटणा, कानपूर, लखनऊ, हावडा आदी पूर्वेकडील भागातून येणाऱ्या गाड्या या फलाटांवर धावतात आणि महाकुंभामुळे या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. याशिवाय नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटही बंद आहे.