आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर कसा मिळवाल रिफंड?; जाणून घ्या रेल्वेचे नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:33 AM2020-05-14T10:33:30+5:302020-05-14T10:35:19+5:30
रेल्वेनं तिकीट रिफंड करण्याचे नियम बदलले; नवी नियमावली जाहीर
नवी दिल्ली: आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यानंतर रिफंड मिळवण्यासाठीचे नियम रेल्वेकडून बदलण्यात आले आहेत. २१ मार्चपासून नवे नियम लागू झालू आहेत. नव्या नियमांनुसार आधीच आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यास पूर्ण रिफंड देण्यात येईल.
१. रेल्वेनं रद्द केलेल्या तिकीटांसाठी-
रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, प्रवासाच्या सहा महिने आधी (प्रवासाच्या आधीचे तीन दिवस वगळून) तिकीट रद्द केल्यास काऊंटरवरुन रिफंड घेता येईल.
२. ई-तिकिटांसाठी-
नव्या नियमांनुसार ई-तिकिटांचे पैसे आपोआप परत दिले जातील. प्रवाशानं ज्या खात्याचा वापर करून तिकीट आरक्षित केलं, त्याच खात्यात पैसे रिफंड केले जातील. क्रिस आणि आयआरसीटीसी यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करतील.
३. रद्द न करण्यात आलेल्या ट्रेन्ससाठी-
जर एखाद्या प्रवाशाला प्रवास करायचा नसल्यास, विशेष प्रकरण म्हणून आरक्षित केलेल्या तिकिटासाठी पूर्ण रिफंड दिला जाईल. पीएसआर काऊंटर किंवा ई-तिकीट अशा दोन्हींसाठी हा नियम लागू असेल.
४. पीएसआर काऊंटरसाठी-
प्रवासी प्रवासाच्या सहा महिने आधीपासून ते प्रवास करण्याच्या तारखेपर्यंत (प्रवासाआधीचे तीन दिवस वगळून) स्टेशनवर टीडीआर (तिकीट डिपॉझिट रिसीट) जमा करू शकतो. यानंतरच्या ६० दिवसांत प्रवाशाला (१० दिवस वगळून) चीफ क्लेम ऑफिसरकडे (सीसीएम) टीडीआरचा तपशील जमा करावा लागेल. त्यानंतर पडताळणी करून त्याला रिफंड दिला जाईल. ई-तिकीटं ऑनलाईन रद्द केली जाऊ शकतात. त्या तिकिटांचं रिफंडदेखील ऑनलाईनच करण्यात येईल.
प्रवासी त्यांचं पीसीआर काऊंटरवरील तिकीट १३९ क्रमांकावर संपर्क साधून किंवा आयआरसीटीच्या संकेतस्थळावर जाऊनदेखील रद्द करू शकतात. प्रवासाच्या सहा महिने आधीपासून तिकीट रद्द केलं जाऊ शकतं.