रेल्वेला १.५२ लाख कोटींचा तोटा
By admin | Published: March 31, 2017 01:21 AM2017-03-31T01:21:24+5:302017-03-31T01:21:24+5:30
दरवर्षी कोेट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचविणाऱ्या भारतीय रेल्वेवरील आर्थिक दबाव वाढत चालला आहे
नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
दरवर्षी कोेट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचविणाऱ्या भारतीय रेल्वेवरील आर्थिक दबाव वाढत चालला आहे. स्वस्त प्रवासी भाड्यामुळे रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागत असून, हा बोजा दरवर्षी वाढतोच आहे.
गेल्या पाच वर्षांत प्रवासी भाड्यात रेल्वेला १.५२ लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यापैकी सर्वाधिक जवळपास ३६ हजार कोटींचा तोटा २०१५-१६ दरम्यान झाला. हा तोटा वर्षागणिक वाढत चालला आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहांई यांनी दिली. भाजपच्या खासदार भारती बेन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लोकसभेत माहिती दिली की, प्रवासी वाहतुकीत रेल्वेला दरवर्षी तोटा सहन करावा लागत आहे.
प्रवासी भाड्याला तर्कसंगत बनविणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेने अंत्योदय एक्स्प्रेससारख्या नव्या गाड्यांत डायनॅमिक भाडे लागू करण्यात आले आहे. राजधानी शताब्दी आणि दुरंतोसारख्या गाड्यांत मागणीवर आधारित फ्लेक्सी किराया घेण्यात येत आहे. याशिवाय विशेष भाडेतत्त्वावर विशेष गाड्याही चालविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.