सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं रेल्वेचं एक पाऊल पुढे; पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:42 PM2018-09-09T16:42:21+5:302018-09-09T16:46:13+5:30
गेल्या वर्षभरात अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट
नवी दिल्ली: असुरक्षित प्रवासामुळे कायम रडारवर असणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वर्षभरात चांगली सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या वर्षभराच्या कालावधीत 75 रेल्वेअपघातांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 वर्षांमधील रेल्वे दुर्घटना आणि त्यातील बळींची संख्या लक्षात घेतल्यास, गेल्या वर्षभरात सुरक्षेच्या बाबतीत रेल्वेची कामगिरी सुधारली आहे. रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सरकारी आकड्यांचा आधार घेऊन ही माहिती दिली.
सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत आठ अपघातांमध्ये 249 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील इंदूर-पाटणा एक्स्प्रेसला झालेला अपघात सर्वात भीषण होता. नोव्हेंबर 2016 मध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानं झालेल्या अपघातात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या 40 वर आली आहे. या काळात दोन मोठे रेल्वे अपघात झाले. ऑगस्ट 2017 मध्ये उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात एका शाळेच्या बसला रेल्वेनं धडक दिल्यानं 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत 139 रेल्वे अपघात झाले होते. त्यात 275 लोकांचा मृत्यू झाला होता. 2014 ते 2015 या कालावधीत 108 अपघातांमध्ये 196 जणांनी जीव गमावला होता. '1 सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीतील आकड्यांची तुलना 1 सप्टेंबर 2017 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीतील अपघातांच्या आकडेवारीशी केल्यास दुर्घटनांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रेल्वे गाड्यांची धडक आणि रेल्वे गाड्या रुळांवरुन घसरण्याच्या घटनांचं प्रमाण 62 वरुन 4 वर आलं आहे,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.