चिंताच मिटली! रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा; २ वर्षांपूर्वी बंद केलेली सुविधा पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:59 PM2022-03-11T20:59:43+5:302022-03-11T20:59:53+5:30
होळीआधी रेल्वेची मोठी घोषणा; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
नवी दिल्ली: होळीच्या आधी रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा आहे. रेल्वेत पुन्हा एकदा प्रवाशांना बेडशीट, चादर आणि पडदे देण्यात येणार आहेत. याबद्दलची घोषणा रेल्वेनं केली आहे. कोरोना काळात रेल्वेनं बेडशीट, चादर देणं बंद केलं होतं. प्रवासी डब्यांमधील पडदेही काढून टाकण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर रेल्वेनं पुन्हा ही सुविधा सुरू केली आहे.
सगळ्या विभागातील व्यवस्थापकांना याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या वस्तूंचा पुरवठा लगेच सुरू करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. याआधी खाद्यपदार्थासह अनेक सुविधा पुन्हा करण्याचे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी चादर आणि बेडशीटची मागणी करत होते. या सुविधा मिळत नसल्यानं प्रवाशांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. या सुविधा ट्रेनमध्ये मिळत नसल्यानं अनेक प्रवासी विमानानं प्रवास करत होते. रेल्वे आणि विमानाच्या तिकीट दरात फारसा फरक नाही. विमान प्रवासामुळे वेळही वाचतो.
कोरोना काळापूर्वी ट्रेनच्या एसी क्लासमध्ये प्रवाशांना एक बेड रोल मोफत मिळायचा. गरीब रथ ट्रेनमध्ये यासाठी नाममात्र शुल्क द्यावं लागायचं. एका बेड रोलमध्ये दोन चादर, एक उशी, एक पांघरूण आणि एक लहान टॉवेल मिळायचं. कोरोना काळात रेल्वेनं ही सुविधा बंद केली होती.