रेल्वेत बंपर भरती! 90 हजार रिक्त जागा भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 01:03 PM2018-02-26T13:03:59+5:302018-02-26T13:03:59+5:30
90 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने जवळपास 90 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशन्स, गँगमेन, स्विचमेन, ट्रॅकमॅन, केबिनमॅन, वेलडर्स, हेल्पर्स आणि पोर्टर्स या पदासाठी रेल्वेमध्ये बंपर भरती सुरू झाली आहे. एनडीए सरकार नोकरीच्या संधी निर्माण करण्यात अयशस्वी ठरल्याची टीका सतत विरोधकांकडून सरकारवर होते आहे. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी रेल्वेमध्ये ही जंबो भरती सुरू झाल्याची चर्चा आहे. रेल्वे सुरक्षिततेमध्ये मजबुती आणण्यासाठी रेल्वेतील रिकाम्या पदासाठी भरती सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे दुर्घटनेमध्ये वाढ झाली आहे. या रेल्वे दुर्घटना थांबविणं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे रेल्वेतील सगळ्या जागा सुरक्षेशी संबंधित श्रेणीत आहेत.
रेल्वेमध्ये सुरक्षेच्या संबधित जवळपास 1 लाख 20 हजार जागा रिकाम्या आहेत. जास्तीत जास्त ग्राऊंड लेवल वर्कफोर्स भरती करून रेल्वे सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. 'रेल्वेतील ही मेगा भरती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होतील. रेल्वेत दरवर्षी 40 ते 45 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. रेल्वे सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी सरकारला जवळपास 4 करोड रूपये अतिरिक्त खर्च करावा लागतो.
दरम्यान, रेल्वेने डी कॅटेगरीमद्ये 63 हजार नोकऱ्यांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामध्ये गँगमन, ट्रॅकमनसह इतर पदांचा समावेश आहे. याशिवाय लोको पायलट्स आणि असिस्टंट लोकोपायलट पदांसाठी 26 हजार 500 पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.