रेल्वेचे २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन?; ५ दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:20 IST2025-02-13T08:19:48+5:302025-02-13T08:20:09+5:30
भारताने जागतिक जैवइंधन क्षेत्रात आघाडी तयार केली आहे. त्यात आज २८ देश व १२ आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश आहे.

रेल्वेचे २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन?; ५ दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करणार
नवी दिल्ली - भारत येत्या पाच वर्षांत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढवेल. भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जनासाठी सज्ज होईल आणि २०३० पर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करण्यात येईल. ऊर्जा क्षेत्रातील हे महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी देश सज्ज असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. हे लक्ष्य अवघड असले तरी गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात भारताने जे मिळवले आहे, त्यानुसार हे लक्ष्य निश्चित गाठता येईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
दिल्ली, द्वारका येथील यशोभूमी (आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर) येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आयोजित ‘इंडिया एनर्जी वीक २०२५’ ही आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन मंगळवारी सुरू झाले. त्याचा शुभारंभ मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारताचे एनर्जी क्षेत्र हे स्रोतांचा पुरेपूर उपयोग करणे, देशात सातत्याने नवनव्या संकल्पना राबवणे, आर्थिक व राजकीय स्थैर्य, धोरणात्मक भौगोलिकता आणि ही भौगोलिकता एनर्जी व्यापाराला अधिक आकर्षक व सुलभ बनवते, भारत हा जागतिक शाश्वततेसाठी कटिबद्ध आहे. या पाच प्रमुख खांबांवर एनर्जी क्षेत्र आधारले असल्याचे ते म्हणाले.
५०० दशलक्ष टनाचा कच्चा माल
जैवइंधनासाठी देशाकडे ५०० दशलक्ष टनाचा कच्चा माल आहे. भारताने जागतिक जैवइंधन क्षेत्रात आघाडी तयार केली आहे. त्यात आज २८ देश व १२ आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारत एनर्जी उपाय देण्यासाठी सज्ज आहे.
सौरऊर्जेमध्ये ३२ पटीने वाढ
दहा वर्षांत सौरऊर्जा क्षमतेत ३२ पट वाढ झाली. लवकरच २० टक्के अनिवार्य इथेनॉल मिश्रणाचा निर्णय होईल. ऑक्टोबरपूर्वी हे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.