आता रेल्वे स्टेशनांवर स्वस्तात मिळणार सॅनिटरी नॅपकिन आणि निरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:44 PM2018-05-26T12:44:48+5:302018-05-26T12:44:48+5:30
रेल्वेने स्वच्छतेसाठी धोरण लागू केले आहे. यामध्ये देशातील 8500 स्थानकांचा विचार केला जात आहे.
नवी दिल्ली- भारतीय रेल्वे मंडळाने आता नवी टॉयलेट पॉलिसी लागू केली आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि निरोध विकण्यात येणार आहेत. या वस्तू रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि आत अशा दोन्ही ठिकाणी विकल्या जाणार आहेत. या वस्तूंचा उपयोग रेल्वे प्रवासी आणि आसपासच्या लोकांनाही व्हावा अशी रेल्वेची इच्छा आहे.
रेल्वे स्थानकाच्या आत व बाहेर स्वच्छतेची व्यवस्था चांगली नसते, उघड्यावर शौच करणे तसेच उघड्यावर लघुशंका करणे तसेच आसपासच्या झोपडपट्ट्यांमधील लोकांद्वारे अस्वच्छताही पसरवली जाते. यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. त्या टाळण्यासाठी हे नवे धोरण अवलंबले जात आहे.
या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी रेल्वेने स्थानक परिसरामध्ये स्त्रीया व पुरुषांसाठी वेगवेगळी शौचालये बांधण्यात येणार असून मासिकपाळीच्या काळात घ्यायची काळजी व गर्भनिरोधक वस्तूंचा वापर याबाबत जागृतीही तेथे केली जाणार आहे. तेथे सॅनिटरी नॅपकिन व निरोध विकण्यात येणार असून. वापरलेल्या वस्तू फेकण्यासाठीही सोय करण्यात येईल. महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी वेगवेगळी शौचालये बांदली जाणार असून त्यात भारतीय व पाश्चात्य असे दोन्ही प्रकार असतील. ही सेवा 8,500 स्थानकांवर लागू होणार असून विविध कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या सीएसआर फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे.