रेल्वेलाही मंदीचा फटका; मालवाहतूकही रोडावली तर प्रवासीसंख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 01:59 AM2019-10-30T01:59:30+5:302019-10-30T06:25:42+5:30
पहिल्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून २९,0६६ कोटी रुपये मिळाले होते.
नवी दिल्ली : देशात मंदीमुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केल्याचा फटका रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून अपेक्षेपेक्षा ३,९१0 कोटी रुपये कमी मिळाले आहेत. मालवाहतूक घटल्याचाच हा परिणाम आहे.
पहिल्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून २९,0६६ कोटी रुपये मिळाले होते. दुसºया तिमाहीमध्ये मात्र मालवाहतुकीतून रेल्वेला २५,२६५ कोटी रुपये इतकेच उत्पन्न मिळाले असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. दुसºया तिमाहीमध्ये प्रवासी भाड्यातूनही अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळाला आहे. पहिल्या तिमाहीत रेल्वेला प्रवासी भाड्यातून १३ हजार ३९८ कोटी ९२ लाख रुपये महसूल मिळाला होता. दुसºया तिमाहीमध्ये मात्र ही रक्कम १३ हजार २४३ कोटी ८१ लाख रुपये इतकीच होती. म्हणजे प्रवासी भाड्यातील घट १५५ कोटी रुपयांची आहे.
तिकीटविक्री कमी
मध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौड यांनी रेल्वेकडून माहिती अधिकार कायद्याखाली मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यांतून किती उत्पन्न मिळाले, याची विचारणा केली होती. रेल्वेने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट विक्रीत यंदा १.२७ टक्क्याने घट झाली आहे. उपनगरीय गाड्यांच्या तिकिटांच्या विक्रीमध्येही या काळात १.१३ टक्क्यांची घट आहे.