Indian Railway: प्रवासामुळे थकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे करणार खास व्यवस्था, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:17 PM2022-06-02T15:17:32+5:302022-06-02T15:18:05+5:30
Indian Railway: जर तुम्हीही ट्रेनच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असाल आणि एखाद्या शहरात पोहोचल्यावर तिथे तुम्हाला हॉटेलसाठी भटकावं लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
नवी दिल्ली - जर तुम्हीही ट्रेनच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असाल आणि एखाद्या शहरात पोहोचल्यावर तिथे तुम्हाला हॉटेलसाठी भटकावं लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेची ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता तुम्हाला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस येथे ट्रेनने उतरल्यानंतर हॉटेलसाठी भटकावे लागणार नाही. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी येथे एक पॉड हॉटेल तयार करण्यात येत आहे. हे पॉड हॉटेल जूनच्या अखेरीस लोकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेकडून मुंबई महानगरामध्ये अशा प्रकारची ही दुसरी सुविधा असेल. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर प्रवाशांसाठी एक पॉड हॉटेल सुरू करण्यात आले होते. सीएसएमटीच्या मेन लाईनवर वेटिंग रूमच्या जवळ बनवण्यात येईल.
सीएसएमटीच्या मेन लाईनवर बनणाऱ्या या पॉड हॉटेलमध्ये एका वेळी ५० जणांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले की, रेल्वेला या माध्यमातून ५५.६८ लाख रुपयांचा महसूल मिळेल. उल्लेखनीय बाब म्हणजे पॉड हॉटेलमधील रुमचे भाडे हे पारंपरिक हॉटेलच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे प्रवाशांची वेळ आणि पैसा हे दोघांचीही बचत होणार आहे.
सेंट्रल रेल्वेकडून ज्या पॉड हॉटेलची या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. त्यामध्ये लहान लहान खोल्या असतात. त्यांना कॅप्सुल हॉटेल असंही म्हणतात. काही लोक याला सिंगल प्रायव्हेट रूम असंही म्हणतात. येथे प्रवाशांना पायाभूत सुविधा जसे की, आराम करणे आणि त्यांना फ्रेश होण्याची सुविधाही दिली जाते. पॉड हॉटेलमध्ये एअरक्राफ्टच्या कॉकपिटसारख्या खोल्या असताता. तसेच तिथे प्रवाशांसाठी आराम करण्याची आणि फ्रेश होण्याची सोय केलेली असते.