उत्तराखंडमध्ये अचानक पूर, कडे कोसळल्यामुळे हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:18 AM2020-08-14T02:18:25+5:302020-08-14T02:19:01+5:30

येत्या २-३ दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता

Rain and topography triggering flash floods landslides in Uttarakhand hills | उत्तराखंडमध्ये अचानक पूर, कडे कोसळल्यामुळे हाहाकार

उत्तराखंडमध्ये अचानक पूर, कडे कोसळल्यामुळे हाहाकार

Next

नवी दिल्ली : उत्तराखंडाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी अचानक पूर आला आहे. अनेक ठिकाणी कडे कोसळले आहेत. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आगामी २ ते ३ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्य आपत्ती निवारण केंद्रानेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय जल आयोगाने टिष्ट्वटरवर जारी केलेल्या अधिकृत पूर अंदाजात म्हटले आहे की, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्यप्रदेश या भूप्रदेशात अचानक पूर येऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

सूत्रांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि कोसळलेले कडे यामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा महामार्ग जवळपास ३0 तासांपासून बंद आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे आमचे जगणे दुस्तर झाल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. चीन सीमेला लागून असलेल्या भागांचा संपर्क तुटला आहे.

हेनवल नदीच्या काठावरील लोकांना हलविले
गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या १0 सें.मी.वर वाहत आहे. गंगेची उपनदी असलेल्या हेनवल नदीने पात्र सोडल्यामुळे काठावरील गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे मुनी की रेती पोलीस ठाण्याचे एसएचओ किशोर सकलानी यांनी सांगितले.

चंपावत जिल्ह्यातील शारदा बॅरेजची पाणीपातळी वाढत आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे उत्तर प्रदेशातील १0 जिल्ह्यांना धोका संभवतो.
२ ते ३ दिवसांत पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Rain and topography triggering flash floods landslides in Uttarakhand hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर