पाऊस गायब; डोळे आभाळाकडे
By admin | Published: July 10, 2015 01:44 AM2015-07-10T01:44:57+5:302015-07-10T01:44:57+5:30
वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे
नवी दिल्ली : वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
या महिन्याच्या प्रारंभी जवळपास सर्वच भागात पावसाने ओढ दिली असून १ जून ते ८ जुलै या काळात देशात ४ टक्के कमी पाऊस झाला आहे. कालपर्यंत हे प्रमाण उणे २ टक्के राहिले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) सूत्रांनी म्हटले आहे.
मध्य भारतात जूनमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला असला तरी जुलै महिन्यात उणे ८ टक्के, दक्षिण भागात उणे ७ टक्के तर ईशान्य भारतात उणे ४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वायव्य भारतात जुलैच्या प्रारंभी बरा पाऊस झाला पण अलीकडे तेथेही पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून आले.
हवामान विभागाने यापूर्वीच देशात सामान्यापेक्षा कमी म्हणजे ८८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा १६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली; मात्र तरी जुलै आणि आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ आणि १० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता पाहता एकूणच सरासरी कमी होणार आहे.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने जुलैमध्ये सामान्यापेक्षा जास्त(१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य(९९ टक्के) तर सप्टेंबरमध्ये (९६ टक्के) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ३० टक्के, कर्नाटक किनारपट्टी ३२ टक्के तर कोकण आणि गोव्यात १५ टक्के कमी पाऊस असण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)