पाऊस थांबला, पुराचा विळखा मात्र कायम
By Admin | Published: December 4, 2015 02:58 AM2015-12-04T02:58:14+5:302015-12-04T02:58:14+5:30
तीन दिवसांपासून सुुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गत ४० वर्षांमध्ये प्रथमच अडयार नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या रात्रीपासून पाऊस थांबला असला तरी चेम्बरामबक्कम
चेन्नई : तीन दिवसांपासून सुुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गत ४० वर्षांमध्ये प्रथमच अडयार नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या रात्रीपासून पाऊस थांबला असला तरी चेम्बरामबक्कम जलाशयातून ३० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने चेन्नईच्या अनेक नव्या भागांमध्ये पूर आला आहे. अनेक वस्त्या अद्यापही जलमय असल्याने लोक अद्यापही आपापल्या घरात अडकून पडले आहेत. अजूनही अनेक लोक रेल्वेस्थानक व बसस्थानकांवर अडकून आहेत. चेन्नई विमानतळावर अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलास पाचारण करण्यात आले आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सर्वोतोपरी मदत - सरकार
तामिळनाडूतील पुरात मृत्युमुखी पडलेल्या व प्रभावित लोकांबद्दल संवेदना व्यक्त करीत केंद्र सरकारने सर्वोतोपरी मदतीची ग्वाही दिली आहे. संकटाच्या याक्षणी सरकार तामिळनाडूतील लोकांसोबत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. गेल्या २४ तासांत ३३० मि.मी. पावसाची नोंद झाल्याने चेन्नईला एखाद्या बेटाचे रूप आले आहे. हवाई दल, लष्कराचे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. केंद्र सरकार पूरप्रभावित जनतेसोबत आहे, असे राजनाथ म्हणाले. (वृत्तसंस्था)
दुधाची पिशवी शंभर रुपये, भाजीपाला ९० रु. किलो
पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरप्रभावित चेन्नईत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही वीज, वाहतूक आणि संपर्क सेवा खंडित राहिल्याने चेन्नईकरांच्या समस्येत भर पडली.
दूध आणि पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी लांबचलांब रांगा लागल्या. याचदरम्यान दुधाची एक पिशवी १०० रुपयांत तर भाजीपाला ८० ते ९० रुपये किलो भावात विकल्या गेला.
३० रुपयांत मिळणारी पाण्याची बाटली १५० रुपयांत विकली गेली. शहरातील बहुतांश सुपर मार्केट व हॉटेल बंद आहेत वा त्यातील सामग्री संपली आहे.
बचावकार्य युद्धस्तरावर
चेन्नई व तामिळनाडूच्या पूरप्रभावित भागांमध्ये लष्कर, हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस आदींनी युद्धस्तरावर मदतकार्य आरंभले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपल्या बचाव कर्मचाऱ्यांची संख्या गुरुवारी दुपटीने वाढवत १२०० केली. अनेक भागांत अन्नपाण्याची पाकिटे पुरवली जात आहेत.
आतापर्यंत शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
फेसबुकचे ‘सेफ’ बटन
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटने चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत, ‘सेफ’ नावाचे बटन उपलब्ध करून दिले आहे. फेसबुक वापरकर्त्याने आपल्या खात्यावरील ‘सेफ’ या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचा मजकूर त्याच्या मित्रांना आपोआप कळेल.
गुगलनेही मुख्य पानावर ‘रिसोर्स आॅफ चेन्नई फ्लड’ नावाचे लिंक दिले आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या माहितीसोबतच पुराबाबतची माहितीही कळू शकते; शिवाय गुगलने पुराचा एक व्हिडिओही अपलोड केला आहे.
अभूतपूर्व पावसामुळे चेन्नईत उद्भवलेली प्राणहानी व वित्तहानी पाहून मी दु:खी आहे. या संकटाच्या क्षणी माझी प्रार्थना आणि संवेदना तामिळनाडूच्या लोकांसोबत आहे.
- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती