दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज पावसाचा इशारा; जाणून घ्या, देशभरातील हवामानाची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:38 AM2023-11-29T08:38:35+5:302023-11-29T08:53:46+5:30
उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे.
नवी दिल्ली: दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील हवामान आज बदलले आहे. अनेक भागात थंड वारे व हलका पाऊस सुरू असून असेच वातावरण येत्या काही दिवसांत राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे.
स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनूसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिम हिमालयाच्या जवळ पोहोचला आहे आणि येत्या ३-४ दिवसांत उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमधून जाईल. खालच्या टेकड्यांवर हलका पाऊस आणि १२,०००' पेक्षा जास्त उंचीवर मध्यम आणि वरच्या भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव मध्य भारतातून दक्षिणेकडील भागांपर्यंत वाढेल.
दिल्लीत आज (२९ नोव्हेंबर) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनूसार, आज दिल्लीत आकाश सामान्यतः ढगाळ असेल आणि खूप हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडेल. तापमानाबद्दल बोलायचे झाल्यास, किमान तापमान १२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते. याशिवाय हवेची गुणवत्ता आजही खूप खराब राहू शकते.
उत्तर प्रदेशातील हवामान स्थिती
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये थंड वारे आणि हलका पाऊस सुरु आहे. तापमानाबद्दल बोलायचे झाल्यास, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस असू शकते आणि नोएडामध्ये किमान तापमान १५ आणि कमाल २६ अंश सेल्सिअस देखील असू शकते.
या भागात पावसाची शक्यता
स्कायमेटच्या मते, अंदमान आणि निकोबार बेटांवर, तटीय तमिळनाडूचा काही भाग आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम हिमालयात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम हिमालयाच्या वरच्या भागात हलकी बर्फवृष्टी होऊ शकते.