मध्य प्रदेशात पावसाचे ११ बळी
By admin | Published: July 10, 2016 02:32 AM2016-07-10T02:32:31+5:302016-07-10T02:32:31+5:30
मध्य प्रदेशला संततधार पावसाने झोडपून काढले असून, आतापर्यंत ११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. सतना जिल्ह्यात लष्कराने सुमारे ४00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशला संततधार पावसाने झोडपून काढले असून, आतापर्यंत ११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. सतना जिल्ह्यात लष्कराने सुमारे ४00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की, गेल्या तीन ते चार दिवसांत आठ लोक मृत्युमुखी पडले आहेत. भोपाळमध्ये दोन जण मरण पावले आहेत. याशिवाय टिकमगड, रेवा, झाबुआ, बेतूल, रायसेन आणि पन्ना येथे प्रत्येकी एक जण मरण पावला आहे. शाहपूर तलावाजवळ शनिवारी दुपारी एक जण वाहून गेला. तत्पूर्वी, मांडला आणि सिंगरौली जिल्ह्यांत प्रत्येकी एक जण मरण पावला होता.
चौहान यांनी सांगितले की, नर्मदा नदी होशंगाबाद येथे धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. मदतीसाठी १0७९ हा दूरध्वनी क्रमांक सरकारने कार्यरत केला आहे. रविवारची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन मदत व बचाव कार्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
400 लोकांना रघुराज तालुक्यात लष्कराने सुरक्षित स्थळी हलविले. सतना जिल्ह्यात तमस, सोनी व मंदाकिनी या नद्यांना महापूर आला आहे.
पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सागर, जबलपूर, होशंगाबाद, भोपाळ, इंदौर, उज्जैन आणि ग्वाल्हेर या ठिकाणांना पावसाचा धोका आहे.
१ जूनपासून राज्यातील २५ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १६ जिल्ह्यांत सरासरीएवढा, तर ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. केवळ एका जिल्ह्यात पावसाची तूट आहे.