मध्य प्रदेशात पावसाचे २० बळी
By admin | Published: July 11, 2016 04:21 AM2016-07-11T04:21:14+5:302016-07-11T04:21:14+5:30
जोरदार पावसामुळे आलेल्या पुराच्या तडाख्यात मध्य प्रदेशात गेल्या पाच दिवसांत २० जण ठार झाले असून, सर्वाधिक फटका भोपाळला बसला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागांत बचाव मोहीम राबवून
भोपाळ : जोरदार पावसामुळे आलेल्या पुराच्या तडाख्यात मध्य प्रदेशात गेल्या पाच दिवसांत २० जण ठार झाले असून, सर्वाधिक फटका भोपाळला बसला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागांत बचाव मोहीम राबवून जवळपास ५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवून वाचविण्यात आले.
दहा वर्षांतील उच्चांक मोडत भोपाळ शहरात जोरदार पाऊस झाला असून, यामुळे विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांत ६ जण ठार झाले आहे. शुक्रवारी रात्री १ वाजेपासून, तर सकाळी ६ वाजेपर्यंत ५ तासांत भोपाळ शहरात ९ इंच पाऊस झाला.
पावसाच्या तडाख्यात राज्यभरात २० जण ठार झाल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. मुख्यमंत्री चौहान यांनी जोरदार पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व ५१ जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भागातील लोकांचा तातडीने मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पुढच्या २४ तासांत उज्जैन आणि होशंगाबादसह भोपाळमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सतना जिल्ह्यात ओढे आणि नद्यांना आलेल्या पुरात मागच्या २४ तासांत एक वृद्ध आणि एक तरुण वाहून गेला. (वृत्तसंस्था)