देशातील ११५ जिल्ह्यांमधील पावसात झाली घट; भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांचा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 09:17 AM2020-04-02T09:17:28+5:302020-04-02T09:31:04+5:30
गेल्या ३० वर्षांचा अभ्यास : ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम
पुणे : ग्लोबल वॉर्मिंगचा भारतातील पाऊसमानावर काय परिणाम होत आहे, याचा अभ्यास भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी केला असून त्यात पाच राज्ये वगळता अन्य राज्यांतील पावसामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याच वेळी महाराष्ट्रासह काही राज्यांतील पावसाळी दिवसांमध्ये वाढ होत आहे. मात्र, देशातील ११५ जिल्ह्यांमधील पावसाच्या प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले आहे.
यापूर्वी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी १९०१ ते २०१० या ११० वर्षांत पावसात कसा बदल झाला, याचा अभ्यास केला होता. आता केवळ ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम झाला, या दृष्टीने भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी १९८९ ते २०१८ या ३० वर्षांत देशभरात पडलेल्या पावसाचा अभ्यास केला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. संसदेच्या निदेशनानुसार भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय आणि नागालँडमध्ये पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. या राज्यांबरोबरच अरुणाचल व हिमाचल प्रदेशात संपूर्ण वर्षभर पडणाऱ्या पावसांमध्ये घट झाल्याचे या अभ्यासातून दिसून येते. महाराष्ट्रात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ८९ टक्के पाऊस हा पावसाळ्यातील चार महिन्यांत पडतो.
कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छ, राजस्थानचा दक्षिण भाग, तमिळनाडूचा उत्तर भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग व त्याच्या लगतचा दक्षिण पश्चिम ओडिशा, छत्तीसगडचा बहुतांश भाग, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोराम आणि उत्तराखंड या भागातील पावसात वाढ झाली आहे. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटले देशातील ११५ जिल्ह्यांत वर्षभरात पडणाºया पावसामध्ये घट झाली असून त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये पावसाळ्यातील चार महिन्यांत सरासरी ६४८.७ मिमी, तर वर्षभरात ७८९.७ मिमी पाऊस पडतो. त्या वेळी परभणीमध्ये चार महिन्यांत सरासरी ७०७ मिमी पाऊस पडतो, तर वर्षभरात ९६२ मिमी पाऊस पडतो. या पाऊसमानात घट होत असल्याचे गेल्या ३० वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
..........
ड्राय डेमध्ये झालेली वाढ
पावसाळ्यात पाऊस न पडलेल्या दिवसांमध्ये वाढ झालेल्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील दक्षिण किनारपट्टीचा प्रदेश, बिहार, छत्तीसगडचा उत्तर भाग, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल त्याचबरोबर संपूर्ण वर्षाचा विचार केला तर या प्रदेशांसह तेलंगणामध्ये पाऊस न पडलेल्या दिवसांमध्ये वाढ झालेली दिसते. त्या वेळी गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमध्ये पाऊस न पडलेल्या दिवसांची संख्या कमी झालेली दिसून येते.
..........
पावसाळी दिवसांमध्ये घट :
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांत पावसाळी दिवसांमध्ये घट होताना दिसत आहे. त्याचबरोबर, जोरदार पावसाच्या दिवसांमध्ये घट झाली आहे.
...........
पावसाळी दिवसांमध्ये वाढ :
नंदुरबार, जळगाव, रायगड, कोल्हापूर आणि भंडारा या जिल्ह्यांतील पावसाळी दिवसांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच, या जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या दिवसांतही वाढ झालेली दिसते.