राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पाऊस, वादळाचे ५० बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:25 AM2019-04-18T04:25:34+5:302019-04-18T04:25:45+5:30
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाशी संबंधित दुर्घटनांत राजस्थानात २१, मध्यप्रदेशात १५, गुजरातेत १० आणि महाराष्ट्रात तीन जणांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल टिष्ट्वटरद्वारे तीव्र दु:ख व्यक्त केले. मोदी यांनी फक्त त्यांचे राज्य गुजरातमधील जीवितहानीबद्दलच दु:ख व्यक्त केले, असे म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टीका केली. नंतर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी यांनी बिगरमोसमी पाऊस आणि वादळामुळे मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि देशाच्या इतर भागांत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. या संकटात सापडेल्यांना सर्व प्रकारची मदत देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.’ नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आले आहेत, असेही पीएमओने म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पावसाचा फटका बसलेल्या भागांतील परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष असून, या राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असे म्हटले.
कमलनाथ टिष्ट्वटरवर म्हणाले की, ‘मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, फक्त गुजरातचे नाही. मध्यप्रदेशातही दहा जणांचा पाऊस, वीज व वादळाने बळी गेला आहे; परंतु तुमच्या भावना फक्त गुजरातपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. भलेही तुमच्या पक्षाचे इकडे सरकार नाही, तरीही येथे लोक राहतात.’
भाजपने नाथ हे नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांवरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला. भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख व राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांनी दिल्लीत म्हटले की, ‘नाथ यांना नैसर्गिक दुर्घटनांत हानी झाल्यावर मदतीसाठी केंद्राला त्याची आधी माहिती द्यावी लागते, या प्रक्रियेची माहिती आहे. तरीही ते टिष्ट्वटरद्वारे टीका करून राजकारण करीत आहेत.’
>पिकांचीही हानी
या पावसाने गुजरात आणि राजस्थानात पिकांचीही हानी झाली आहे. राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या घटनांत जनावरेही दगावली आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून ७१ वर्षांची महिला, ३२ वर्षांचा तरुण आणि मंदिराचा पुजारी मरण पावला.