दिल्लीमध्ये पावसाने १२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:15 AM2021-09-02T07:15:49+5:302021-09-02T07:15:56+5:30
मंगळवारपासून सुरू आलेल्या मुसळधार पावसाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे
विकास झाडे
नवी दिल्ली : मुसळधार पावसाने सप्टेंबर महिन्यातील १२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाल्यांप्रमाणेच रस्तेही तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
मंगळवारपासून सुरू आलेल्या मुसळधार पावसाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. हवामान खात्याने तीन दिवसांपूर्वीच अलर्ट जाहीर केला होता. दिल्लीत २ आणि ३ सप्टेंबरला सौम्य पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरुग्राम, मानेसर, फरिदाबाद, बल्लभगड तसेच तोशाम, भिवानी, झज्जर, नारनौल, महेंद्रगढ, कोसलीसह विविध ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना उन्हाचा त्रास होत होता. आठवडाभर पावसाळी हवामान तयार होत होते, मंगळवारी कमाल तापमान २८.९ अंश सेल्सिअसवर, सामान्यापेक्षा पाचपेक्षा कमी होते.
यापूर्वी कधी?
बुधवारी दिल्लीत विक्रमी पावसाची नोंद घेण्यात आली. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात २००९ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. १० सप्टेंबर २००९ रोजी दिल्लीत ९८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती; परंतु गेल्या २४ तासांमध्ये सफदरजंगमध्ये ११२.१ मिमी, लोधी रोड १२०.२ मिमी, पालम ७१.१ मिमी, आयानगरमध्ये ६८.२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.