गुजरातमधील जुनागडमध्ये पावसाचा हाहाकार, पाण्यात वाहून गेल्या कार आणि म्हशी; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:17 PM2023-07-22T22:17:00+5:302023-07-22T22:17:35+5:30
गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे निवासी भगात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात गुरे आणि कार वाहून जाताना दिसत आहेत.
गुजरातमधील काही भागांत मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. याचवेळी अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जुनागड आणि नवसारी येथे पावसानंतर संपूर्ण घरे पाण्यात बुडालेली दिसत आहेत. यादरम्यान जुनागड जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसळधार पावसानंतर सर्वत्र पाणीचपाणी दिसत आहे.
नवसारी जिल्ह्यातही चार तासांत 13 इंच पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागातील घरे ५ फुटांपर्यंत पाण्याखाली गेली आहेत. रस्ते तुडुंब भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गिरनार आणि दातार डोंगरावर मुसळधार पावसामुळे कळवा नदीला पूर आला आहे. त्याचवेळी हवामान खात्याने आज भावनगर, नवसारी आणि वलसाडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
जुनागडमध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुनागडमध्ये आज सकाळी 6 ते 8 या दोन तासांत जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी बुधवारी सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळी 6 ते 10 या चार तासांत जुनागड जिल्ह्यातील मंगरूळ येथे 8.9 इंच, मलियाहाटीना येथे 6.2 इंच, वेरावळमध्ये 4.2 इंच, सुत्रापाडा आणि सौराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 2.7 इंच पावसाची नोंद झाली आहे.
गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे निवासी भगात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात गुरे आणि कार वाहून जाताना दिसत आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका, गीर सोमनाथ, जूनागड आणि राजकोटला बसला आहे.
VIDEO | Cattle, vehicles wash away in heavy flow of water as incessant rainfall trigger severe flooding in residential areas in Gujarat's Junagadh district. pic.twitter.com/e8lI5Ucj6i
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2023
या पावसात रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यात वाहने बुडाली आहेत. जुनागड जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुनागडमधील सखल भागात ५ ते ६ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. शहरातील भवनाथ परिसरात याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे जोरदार प्रवाहात अनेक प्राणी वाहून गेले आहेत.